शिवजयंतीनिमित्त मावळा प्रतिष्ठानतर्फे भव्य मिरवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. रायगड जिल्ह्यातही ठिकठिकाणी शिवजयंतीनिमित्त मिरवणुका व भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग शहरात मावळा प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी वातावरण संपूर्ण भगवेमय झाले होते.

अलिबाग शहरातील राम मंदीर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी सर्व शिवभक्त भगवे फेटे घालून पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत सामील झाले होते. मिरवणुकीचे आकर्षण म्हणजे भव्य अशी तुळजाभवानीची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्याचबरोबर पुलमावा येथे शहिद झालेल्या जवानांना शिवभक्तांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. तर मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांची वेशभूषा बच्चे कंपनीने सादर केली होती.

ढोल ताशांच्या गजरात शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी मैदानी कवायतीच्या कसरती शिवभक्तांनी सादर केल्या. शिवाजी महाराज यांची मिरवणूक राममंदिरपासून महावीर चौक, शेतकरी भवन, ठिकरूळ नाका, जामा मशीदमार्गे शिवाजी पुतळ्यापर्यत काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शहरातील प्रतिष्टीत व्यक्तीसह महिला, बच्चे कंपनी सहभागी झाले होते.