।। शिवकालीन गणेशोपासना ।।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आसावरी जोशी, [email protected]

शिवरायांच्या काळात गणेशाचा उत्सव होता…? कसा साजरा केला जायचा…? थोडे शोधले असता खूप लडीवाळ आणि मनोहारी संदर्भ हाती लागले. पाहूया शिवकालीन गणेशोपासना…

महाराष्ट्राची लाल-काळी माती तीन दैवतांची मनापासून पूजा करते. या मातीने तीन दैवतांना सदोदित आपल्या मस्तकी धारण केले आहे… आणि ही तिन्ही दैवतं या रांगडय़ा मातीत इतकी मिसळून गेली आहेत… की या तिघांनी या मातीला नेहमीच शिरी वागवले आहे… हृदयाशी कवटाळले आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे इमान या तीन दैवतांशी येऊन विसावते… गणपती… विठ्ठल… आणि छत्रपती शिवाजी महाराज… तुमचे-माझे शिवराय!!

सावळा विठ्ठल आणि शिवराय पूर्णतः या सह्याद्रीशी एकरूप झालेले… हा सह्याद्रीच त्यांचा आत्मा. त्यांचा सखा… पण गणराय मात्र गोऱयापान हिमवानातून या रांगडय़ा सह्याद्रीत पाहुणचारासाठी आले आणि इथलेच होऊन गेले. त्याचे घर जरी उत्तरेतील हिमालयात असले तरी त्याचा उत्सव दणक्यात साजरा केला जातो तो या मराठी मातीत… सह्याद्रीच्या कुशीत…

विठ्ठल आणि गणपती ही जनामनांची लोकदैवतं… एक युगानुयुगं घट्टपणे एका जागी उभा राहून भक्तांना साद घालतो आहे, तर दुसरा लडीवाळपणे आपल्या समस्त भक्तांच्या घरी राहून ऐसपैस पाहुणचार घेऊन त्याने वाढलेली मीठभाकर खाऊन तृप्त होतो… आपल्या घरातील सुखदुःखांशी सहज एकरूप होतो. सोबत आपल्या मायबाईलाही घेऊन येतो.

या साऱया दैवतांचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे या न त्या रूपाने, कारणाने आपल्या राजाशी अर्थात शिवरायांशी फार जिव्हाळ्याने… ममतेने… आणि मनोहारी जोडले गेले आहेत. तुकोबारायांची शिवरायांशी झालेली भेट सगळ्यांनाच ठाऊक आहे. पुण्यातील लाल महालात ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगवाणीचे संस्कार जिजाऊंकडून घेऊनच शिवराय मोठे झाले.

मला खूप उत्सुकता होती ती गणपती बाप्पा आणि शिवरायांच्या संदर्भाची… खूप कमी संदर्भ या दोघांबाबत सापडतात. मूळात शिवराय हे देवीदेवतांचा अत्यंत सन्मान आणि उपासना करणारे असले तरी पूजाअर्चनेत किंवा कर्मकांडात वेळ घालवणारे कधीच नव्हते… आणि अर्थात तेवढा वेळही त्यांच्याकडे नव्हता. मुखी आदिमायेचे नाव घेऊन अखंड ध्यास होता स्वराज्याचा… रयतेचा.

आरती शिवरायांसाठी
तरीही मराठी मनाच्या या दोन मानबिंदूंचा संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला तर खरोखरच खूप छान आणि मनःस्पर्शी गोष्टी पुढे आल्या. बाप्पाची प्रत्येकाच्या मुखी रूळणारी… आळवली जाणारी आरती… सुखकर्ता… दुःखहर्ता… समर्थ रामदासांनी ही आरती रचली ती शिवरायांसाठीच. समर्थांच्या आनंदवनभुवनी म्हणजे सुंदर मठ- शिवथर घळ या ठिकाणी त्यांच्या सगळ्या ग्रंथसंपदेचा जन्म झाला. तेथेच ही आरती शिवरायांच्या रक्षणासाठी समर्थांनी गणेशाला आळवली. अफझल खान छत्रपती शिवरायांना मारण्यासाठी विजापूरहून निघाला (1658). या विघ्नाचा संदर्भ या आरतीमध्ये सुरुवातीसच आला आहे.

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।।
आणि
दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना।।

आरतीच्या या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला स्वराज्यावर आलेल्या अफझल खानाच्या या संकटापासून शिवरायांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केली आहे. स्वराज्यावरील म्हणजेच शिवरायांवरील आलेलं संकट या निर्वाणीच्या प्रसंगातून राजांचं रक्षण कर अशी बाप्पाची केलेली आर्त विनवणी म्हणजेच ही समर्थकृत आरती.

पहिला सार्वजनिक गणेशोत्सव
गणपती उपासनेचा अजून एक संदर्भ हाती लागतो तोही समर्थांच्याच बाबतीत. शिवराज्याभिषेकानंतर समर्थांनी (1674) सुंदर मठ रामदास पठारावर सार्वजनिक गणेशोत्सव केला. हाच महाराष्ट्रातील मानाचा आणि शिवाजी राजांकरिता केलेल्या नवसाचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव होता. महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात या मूळ उत्सवापासून झाली. वक्रतुंड गणेशाच्या नवसाची सांगता करण्यासाठी समर्थांनी बाप्पाचा उत्सव केला. शिवरायांनी या गणेशोत्सवास सुंदर मठावर भेट दिली. त्यावेळी रामदास स्वामींनी महाराजांना 18 वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र्ाs प्रसाद म्हणून दिली… आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.

जिजाऊंनी वसवला कसबा गणपती
पुण्याचा मानाचा कसबा गणपती. जिजाऊंनी हे देऊळ बांधले. कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ठकार कुटुंबाला जमीन खणल्यावर गणपतीचा हा तांदळा सापडला. ही मूर्ती वसवण्यासाठी जिजाऊंनी हे मंदिर बांधले व गणपतीची स्थापना केली. याला पुण्यात ग्रामदेवतेचा व प्रथम पूजेचा मान आहे. उत्सव काळातील महिलांचा सहभाग हे या गणपतीचे महत्त्वाचे वैशिष्टय़. गणेशोत्सव काळातील संपूर्ण एक दिवसाची जबाबदारी महिला सांभाळतात. अगदी पौराहित्यापासून, सनई चौघडा, भाविकांचे स्वागत व इतर व्यवस्था महिला पाहतात. पालखीतून, ढोलताशांच्या गजरात निघणारी शिस्तबद्ध मिरवणूक हे या ग्रामदेवतेचे वैशिष्टय़.

शिवकालीन गणेशोपासनेचे हे संदर्भ खूप महत्त्वाचे… शिवरायांवरील आपल्या सगळ्यांचेच प्रेम अधोरेखित करणारे… समर्थांच्या आरतीशिवाय कोणत्याही गणेशपूजेची सांगता होऊच शकत नाही. ही आरती महाराष्ट्राच्या दैवतासाठी रचलेली जी कळत नकळत प्रत्येक जण आळवतो आणि या आर्त आळवणीतून शिवरायांचे श्रीमंत योगीत्व अजूनच ठळक… ठसठशीत होत जाते.

संदर्भ – श्रीमद् दासबोध
समर्थ आणि समर्थ संप्रदाय
(सेतू माधवराव पगडी)
राजा शिवछत्रपती – गजानन मेहंदळे