
कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाता दक्ष राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने शुक्रवार, 13 मार्च रोजी आयोजित केलेल्या शिवराय संचलन कार्यक्रमात बदल केला आहे.
लोकाधिकार महासंघाच्या वतीने संचलन काढले जाणार नाही. मात्र त्याच दिवशी महासंघाच्या वतीने हुतात्मा चौक येथे पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मारकाला आणि गेट वे ऑफ इंडिया येथे सायंकाळी 5 वाजता शिवरायांच्या अश्वारूढ पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली जाणार आहे. त्यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी केले आहे.
































































