कोरोना मृतदेह स्मशानभूमीत पोहोचवून अंत्यसंस्कार करणारा ‘जाँबाज’ शिवसैनिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या परिस्थितीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काही कोविड योद्धे माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. येथील हर्षल सुर्वे हा ‘जाँबाज’ शिवसैनिक कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे मृतदेह स्मशानभूमीत पोहोचवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची सेवा करीत आहे. महिनाभरात त्यांनी शंभरहून अधिक मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचवून अंत्यसंस्कारही केले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. बाधित रुग्णांबरोबरच मृत्यूदरही चिंताजनक झाला. 24 तासांत 60हून अधिक रुग्ण दगावले जाऊ लागल्याने देशात कोल्हापूरचा मृत्यूदर सर्वाधिक झाला. 15 ते 20 मिनिटांना एक मृत्यू असे विदारक चित्र निर्माण झाले. त्यामुळे येथील पंचगंगा स्मशानभूमीवर मोठा ताण पडला. परिणामी, रक्षाविसर्जनाची पूर्वीची परंपरा बदलून एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच ठिकाणी पाच तासांनंतर रक्षाविसर्जन होऊ लागले. या परिस्थितीत मृतदेह पोहोचविण्यासाठी महापालिकेची शववाहिका आणि कर्मचाऱ्य़ाची प्रचंड ओढाताण पाहून हर्षल सुर्वे यांनी या कर्मचाऱ्य़ाचा ताण कमी करण्यासाठी स्वतः सहकारी चैतन्य अष्टेकर यांच्यासह रुग्णालयातून मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचविण्यास सुरुवात केली.

महापालिका प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर सीपीआर येथून महापालिकेच्या शववाहिकेतून हर्षल सुर्वे मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचवू लागले. शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त काही दानशूरांनी एक शववाहिकाच हर्षल सुर्वे यांच्यामार्फत सीपीआर रुग्णालयासाठी दिली. यातून सहा दिवसांत 45हून अधिक मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचविण्यात आले.

सुरुवातीला हतबल नातेवाईक, मित्र फोन करायचे. आता ‘सीपीआर’मधून कोविड मृतदेह स्मशानभूमीत पोहोचविण्यासाठी फोन येतात. कोरोनामुळे उपस्थित नातेवाईक अंत्यसंस्कारावेळी घाबरलेले असतात. अशा वेळी त्यांना धीर देत पुढे होऊन मृतदेह चितेवर ठेवून अंत्यसंस्काराची प्रक्रिया आपण आणि सहकारी करीत असल्याचे हर्षल सुर्वे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.

पहिली महिला शववाहिकाचालक प्रिया पाटीलचे धाडस

शववाहिकेवरील पुरुष चालकांप्रमाणेच आता प्रिया पाटील या महाविद्यालयीन युवतीच्या रूपाने प्रथमच शववाहिकेचे स्टेअरिंग एका महिलेच्या हाती आले आहे. मध्यमवर्गीय आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या कुटुंबातून आलेल्या प्रिया पाटील हिने कुटुंबीयांच्या परवानगीने महापालिका प्रशासनामार्फत हर्षल सुर्वे यांच्याशी संपर्क साधला. तिची जिद्द आणि काम करण्याची चिकाटी पाहून हर्षल सुर्वे यांनी तिलाही आपल्या शववाहिकेवर चालक म्हणून कार्यरत केले. राकेश सावंत या चालकासह तिचे हे धाडसी कार्य सुरू आहे.