शिवतीर्थावर उसळल्या भक्तीच्या लाटा, शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आज शिवतीर्थावर संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिकांची रीघ लागली होती. ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी स्मृतिस्थळाचा परिसर दुमदुमून गेला होता. शिवतीर्थावर अक्षरशः भक्तीच्या लाटा उसळल्या…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी असंख्य शिवसैनिकांचे जत्थे सकाळपासून शिवतीर्थाकडे येत होते. हातात भगवे ध्वज, भगवी टोपी, गळय़ात भगवे उपरणे घेतलेले असंख्य शिवसैनिक स्मृतिस्थळासमोर श्रद्धेने नतमस्तक होत होते. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना भवनाचा परिसर भगवामय करण्यात आला होता.

फुलांची सजावट
शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर रंगीबेरंगी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. लाल-सफेत फुलांनी व झेंडूंच्या फुलांच्या माळांची सजावट केली होती. शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरीला चाफ्यांच्या फुलांचा हार घातला होता. या परिसरात आकर्षक रोषणाईही केली होती. स्मृतिस्थळाच्या चारही बाजूंना भगवे ध्वज लावण्यात आले होते.

नेत्यांपासून सर्वसामान्य नतमस्तक
शिवसेना नेत्यांपासून शिवसैनिकांपर्यंत आणि सर्वसामान्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सारेच स्मृतिस्थळावर नतमस्तक होत होते. माहीममधील दिव्यांग शिवसैनिक गिरीश पाटील हे अपंगांसाठी खास तयार केलेल्या तीन चाकी सायकलवरून स्मृतिस्थळाला वंदन करण्यासाठी आले होते.

रुद्राक्षांपासून साकारले शिवसेनाप्रमुखांचे पोर्ट्रेट
पवईतील कॉन्सेप्ट आर्टिस्ट चेतन राऊत यांनी तब्बल 33 हजार रुद्राक्षांपासून साकारलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोझॅक पोर्ट्रेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शिवसेना भवनाच्या समोर सुमारे आठ फूट बाय आठ फूट आकाराचे सुमारे 60 ते 70 किलो वजनाचे हे पोर्ट्रेट लावले होते. 13 रंगछटांमधून हे थ्री डी पोर्ट्रेट तयार केले आहे. त्यासाठी खास नेपाळमधून पंचमुखी रुद्राक्ष मागवण्यात आले आहेत. पुढील तीन दिवस हे पोर्ट्रेट शिवसेना भवनच्या परिसरात ठेवण्यात येईल. चेतन राऊत यांनी एक लाख रुपये खर्च करून हे पोर्ट्रेट तयार केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात हे पोर्ट्रेट कायमस्वरूपी जतन करून ठेवावे अशी त्यांची इच्छा आहे.

नेत्यांची स्मृतिस्थळावर रीघ
खासदार चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे तसेच परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्मृतिस्थळावर वंदन केले.

चंदनाच्या पादुका
नाशिकमधील शिवसैनिक सुमंत कारवाळ यांनी 2011 मध्ये शिवसेनाप्रमुखांसाठी खास चंदनाच्या पादुका तयार केल्या होत्या. या पादुका घेऊन कारवाळ स्मृतिस्थळावर आले होते.

मोदींची मानवंदना
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून मानवंदना दिली. बाळासाहेब हे शूर होते. त्यांना कुशाग्र बुद्धिमत्तेचे, विनोदाचे वरदान लाभले होते. त्यांच्या वक्तृत्व शैलीने जनतेवर गारूड घातले होते. जनतेचे हक्क-उन्नतीशी त्यांची बांधिलकी अतूट होती, असे मोदींनी म्हटले आहे.