शिवसेना भाजप युतीला 233 विधानसभा मतदारसंघात आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीत एनडीएला दणदणीत विजय मिळाला असून राज्यात भाजप शिवसेना युतीने जबरदस्त कामगिरी केली आहे. राज्यात शिवसेनेला 18 जागा मिळाल्या असून भाजपला 23 जागा मिळाल्या आहेत. युतीला एकूण 41 जागा मिळाल्या असून विधानसभानिहाय आकडे पाहिल्यास युतीला 233 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे.

राज्यात लोकसभेच्या 48 जागा असून विधानसभेच्या 288 जागा आहेत. एका लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ मोडतात. त्यानुसार भाजपला 121 तर शिवसेनेला 112 ठिकाणी आघाडी आहे. शिवसेनेला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 49 ठिकाणी जास्त आघाडी मिळाली आहे.

या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची दाणादाण उडाली. राज्यात काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली तर राष्ट्रवादीला चार जागांवर विजय मिळाला आहे. नवनीत कौर राणा या अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्यात आहेत तर एमआयएमचे इम्तियाज जलील हे संभाजीनगरातून विजयी झाले आहेत. हे आकडे पाहिल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळून केवळ 44 विधानसभा मतदारसंघात आघाडी आहे.

  • संभाजीनगरची जागा जिंकूनही एमआयएम या पक्षाला केवळ 2 ठिकाणी आघाडी आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास पक्षाला 3 ठिकाणी आघाडी आहे, तर रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाला 4 ठिकाणी आघाडी आहे.
  • प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एकही ठिकाणी आघाडी नसली तरी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सात जागांवरील पराभवासाठी कारणीभूत ठरली आहे.
  • कोकण विभागात एकूण 12 लोकसभेच्या जागा आहेत, त्यातील 72 विधानसभा मतदारसंघातील तब्बल 38 ठिकाणी शिवसेनेला आघाडी आहे, तर भाजपला 20 ठिकाणी आघाडी आहे. पश्चिम महाराष्ट्रातही शिवसेनेला तब्बल 28 ठिकाणी आघाडी असून भाजपला 26 ठिकाणी आघाडी आहे. तर राष्ट्रवादीला 16 ठिकाणी आघाडी मिळाली आहे.
  • मराठवाड्यात 48 विधानसभा जागांपैकी 21 ठिकाणी भाजपला आणि शिवसेनेला 20 ठिकाणी आघाडी मिळाली आहे. विदर्भात भाजपने 29 जागांवर आघाडी मिळवली असून शिवसेनेने 20 जागांवर आघाडी मिळवली आहे.
  • भाजपने उत्तर महाराष्ट्रात बाजी मारली आहे. 36 विधानसभा मतदारसंघापैकी 25 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर शिवसेनेने 6, काँग्रेस 4 आणि राष्ट्रवादीने एका ठिकाणी आघाडी मिळवली आहे.