
ढोलताशांचा गजर… बॅण्ड पथके… फटाक्यांची आतषबाजी… भगवे ध्वज… भाजपचे झेंडे… भीमशक्तीचे निळे झेंडे… ठिकठिकाणी पुष्पवृष्टी अशा प्रचंड जल्लोषात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये हजारो शिवसैनिक, युवासैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते.
‘मातोश्री’ निवासस्थानी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन आदित्य ठाकरे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना झाले. लोअर परळच्या शिवालय येथून सकाळी 11 वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. तेथून गणपतराव कदम मार्गावरून ही पदयात्रा वरळीच्या दिशेने निघाली. लोअर परळ ते वरळीच्या श्रीराम मिलपर्यंतचा मार्ग या पदयात्रेने व्यापला होता. ढोलताशे आणि बॅण्डच्या गजरात शिवसैनिक आणि महिलांनी नृत्याचे फेर धरले होते. भगव्या झेंडय़ांबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमांचे फलकही लक्षवेधी ठरत होते.
महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भूमिका मांडणार
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या चाळींमधून आदित्य ठाकरे यांच्यावर पुष्पवृष्टी करून नागरिक त्यांचे स्वागत करत होते. आदित्य ठाकरे हात उंचावून त्यांना प्रतिसाद देत होते. यावेळी सौ. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हेही सोबत होते. आदित्य ठाकरे हे वरळी नाका येथील निवडणूक कार्यालयात पोहोचले. तिथे उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार सुनील शिंदेही उपस्थित होते.
शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, उपनेता प्रियांका चतुर्वेदी, आमदार ऍड. अनिल परब, युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, भाजप आमदार मंगलप्रभात लोढा, माजी आमदार डॉ. दीपक सावंत, सचिन अहिर आदी निवडणूक कार्यालयात उपस्थित होते.
पाहा आदित्य ठाकरे यांची रॅली-
…हे प्रेम, आशीर्वाद नवा महाराष्ट्र घडवतील – आदित्य ठाकरे
‘मला प्रेम आणि आशीर्वाद देण्यासाठी शिवसैनिकांबरोबरच सर्व स्त्राrशक्ती, भीमशक्ती आज एकत्र आल्या. महाराष्ट्रात फिरत असताना आणि आता उमेदवारी अर्ज भरायला जात असताना जे प्रेम आणि आशीर्वाद मिळाले ते मला नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी नक्कीच मदत करतील.’ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली. प्रसारमाध्यमांचेही त्यांनी यावेळी आभार मानले. चांगले काम केल्यावर मीडियावाले माझे कौतुक करतात आणि कुठे चुकलो तर तेसुद्धा निदर्शनास आणून देतात. त्यांचेही प्रेम, आशीर्वाद कायम राहोत, असे ते म्हणाले. वरळीतील जनतेचे यावेळी आभार व्यक्त करताना आदित्य ठाकरे यांनी भविष्यात वरळीचा विकास बघायला जगभरातून लोकं येतील अशी ग्वाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी फोन करून आपल्याला शुभेछा दिल्या, असेही त्यांनी सांगितले.
शिवसैनिक आणि जनतेचे धन्यवाद
आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर कार्यालयाबाहेर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘आदित्य निवडणूक लढवतोय याबद्दल आनंद आहे. वरळीतील सर्व शिवसैनिक आणि जनतेला मी धन्यवाद देतो. त्यांनी आनंदाने आदित्यचा स्वीकार केला. कट्टर शिवसैनिक आमदार सुनील शिंदे यांनाही मी धन्यवाद देतो.
समाजसेवेची परंपरा कायम
आमच्या घराण्याची समाजसेवेची परंपरा पुढच्या पिढीतही कायम राहिलेली आहे याबद्दल मला आनंद आहे. आमच्या कुटुंबात माझ्यापर्यंत निवडणूक न लढवण्याचा आमचा निर्णय होता, पण आता नवी तरुण पिढी आली आहे. तिचे विचारही तरुण आहेत. यंग जोश आहे. आमचे कुटुंब आदित्यवर प्रेम करणाऱयांचे सदैव ऋणी राहील. आदित्यवर प्रेम करणाऱया तमाम जनतेला मी हात जोडून नमस्कार करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीतील मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार सुनील शिंदे, नगरसेवक अरविंद भोसले आदी उपस्थित होते.





























































