
माळीवाडा स्टँडवरील रिझर्वेशनची सुविधा अचानक बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसलेला आहे. त्यामुळे ते केंद्र पूर्व सुरू करावं अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज देण्यात आला. याबाबतचे निवेदन आज नगरचे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांना देण्यात आले.
यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौदर, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी नगरसेवक राम नळकांडे, अशोक दहिफळे, प्रशांत गायकवाड, संतोष गेनप्पा महिला आघाडीच्या प्रमुख स्मिता अष्टेकर, सुरेश शिरसागर, सचिन गोरे, संदीप दातरंगे, अक्षय रोकडे, डॉक्टर श्रीकांत चेमटे, आदिसह शिवसैनिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला होता.
शहर शिवसेनेच्या वतीने निवेदन देताना म्हणले की, माळीवाडा बसस्थानकावर आजपर्यंत प्रवाशांना अॅडव्हान्स बुकिंग करण्यासाठी जी सोय होती ती अचानक बंद केल्याबाबत आमच्याकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या. त्याची खातरजमा करण्यासाठी आमचे कार्यकर्ते माळीवाडा बसस्थानकावर जाऊन समक्ष विचारणा करून आले. त्यामुळे आमची खात्री झाली की माळीवाडा बसस्थानकावरील रिझर्वेशनची सुविधा काहीही कारण नसताना बंद करण्यात आलेली आहे. वास्तविक नगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माळीवाडा बसस्थानकावर ही सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. तो नगरच्या नागरिकांचा हक्क आहे. एस. टी. ची सुरवात ज्या स्टैंड वरुन झाली त्या बसस्थानकावर असलेली सुविधा काहीही कारण नसताना व अचानक बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. तरी वरील सुविधा त्वरित पूर्ववत विनाविलंब सुरू करावी. कारण तारकपूर बसस्थानक आमच्याकडील नागरिकांना जाण्यायेण्यासाठी खूप लांब पडले व जाण्यायेण्याची सोय नाही. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही आज निवेदन दिलेले आहेत जर याची योग्य पद्धतीने दखल घेतली नाही तर निश्चितपणे आंदोलनाच्या पर्याय राहणार नाही असा इशारा आम्ही दिला असल्याचेही शहर प्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर व विक्रम राठोड यांनी दिला आहे.

























































