
सामना प्रतिनिधी । अंबड
अंबड तालुक्यात पावसाअभावी पिके करपून गेली असून तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यासह जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने सोमवारी तहसिलदार किशोर देशमुख यांना देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शासकीय कार्यालयावर हल्लोबोल आंदोलन करुन शेतकऱ्यांचे प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारुन त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याबाबत सुचना करण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्वकप्रमुख शिवाजीराव चोथे, माजी आमदार संतोष सांबरे, माजी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, माजी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब पाऊलबुध्दे, तालुकाप्रमुख अशोक बरडे, राजेंद्र भोसले आदी उपस्थिती होते.
तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. अत्यल्प पावसाने धरणे, नद्या पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून तालुक्यात गावे, तांडे, वाड्यावस्त्यांवर पाण्याचे टँकर सुरु करावेत. जनावरासाठी चारा छावण्या सुरु कराव्यात व अंबड तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी परिस्थितीच्या उपाय योजना कराव्यात. विज वितरण कार्यालयावर हल्लाबोल आंदोलनावेळी विज अधिकाऱ्यांना सक्तीची विज वसुली थांबवावी. तसेच विज कनेक्शन कट करु नये अशा सुचना माजी आमदार संतोष सांबरे यांनी केल्या. यावेळी शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडल्या. त्या तातडीने सोडवण्याच्या सुचना करण्यात आल्या. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निवेदन देवून शेतकऱ्यांसाठीच्या योजना राबवतांना योग्य ती काळजी घेवून जनजागृती करावा व शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीबाबत योग्य त्या उपाययोजना राबवण्यात याव्यात, असे सांगितले. यावेळी तालुका संघटक दिनेश काकडे, शहरप्रमुख कुमार रुपवते, युवासेनेचे सिध्देश्वर उबाळे, शिवसेना दलित आघाडीचे अॅड. भास्कर मगरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.






























































