
शिवसेनेच्या दणक्यानंतर नगर महानगरपालिकेच्या प्रशासनाला चांगली जागा आली असून कचरा संकलनाच्या ठेक्यांमध्ये करण्यात आलेला वर्षाचा कालावधी 7 वर्षावरून 3 वर्ष करण्यात आला आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दोन दिवसापूर्वी प्रशासनाला कचऱ्याच्या संदर्भामध्ये प्रसिद्ध केलेल्या निविदेत मोठ्या प्रमाणामध्ये अफरातफर होण्याची शक्यता आहे. सात वर्षाचा कालावधी यामध्ये देऊन एक प्रकारे घोळ घालण्याचा प्रकार केलेला आहे, असा आरोप केला होता. जर प्रशासनाने तत्काळ निर्णय घेतला नाही तर त्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागितली जाईल, असा इशाराही जाधव यांनी लेखी निवेदनाद्वारे आयुक्त पंकज जावळे यांना दिला होता.
महापालिकेकडून नव्याने नियुक्त केल्या जाणार्या कचरा संकलन व वाहतूक ठेकेदाराला आता तीन वर्षांचाच कालावधी मिळणार आहे. महापालिका आयुक्तांनी सात वर्षांपर्यंत वाढवलेली ठेक्याची मुदत रद्द करून, ती पुन्हा तीन वर्षांवर आणली आहे. ठेकेदाराचे काम पाहून जास्तीत जास्त आणखी दोन वर्षे मुदतवाढ देता येईल अशी तरतूद त्यांनी केली आहे.
शहरातील कचरा संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती केली जाते. सध्याच्या ठेकेदाराची मुदत संपुष्टात येत असल्याने मनपाने नव्याने निविदा प्रसिद्ध केलेली आहे. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची मुदत संपण्याच्या दोन दिवस आधीच महापालिकेत ठेकेदार संस्थांची निविदापूर्व बैठक पार पडली.
यात ठेक्याची मुदत तीन वर्षांऐवजी सात वर्षे करावी, अशी मागणी ठेकेदारांकडून करण्यात आली होती. महापालिका प्रशासनानेही ठेकेदारांच्या या मागणीला प्रतिसाद देत ठेक्याची मुदत सात वर्षांपर्यंत वाढवली होती. यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. दुसर्याच दिवशी मनपा प्रशासनाने ठेक्याची मुदत वाढवण्याचा निर्णय मागे घेतला आहे.



























































