शिवसेनेच्या आषाढी महोत्सवाचे उद्या कुडाळला उदघाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित व शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या सौजन्याने कुडाळ मध्ये आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव शुक्रवार दि. २६ ते रविवार दि. २८ जुलै २०१९ रोजी सिद्धिविनायक हॉल, कुडाळ (रेल्वेस्टेशन रोड) येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

याप्रसंगी आमदार वैभव नाईक, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, जि.प.सदस्य नागेंद्र परब, संजय पडते, अमरसेन सावंत, हरी खोबरेकर, राजू कविटकर, वर्षा कुडाळकर, अनुप्रिती खोचरे, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, संतोष शिरसाट, अभय शिरसाट, मंदार शिरसाट, अतुल बंगे, संजय भोगटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

आषाढी महोत्सवानिमित्त शुक्रवार दि. २६ जुलै रोजी सायं.६ वा. संयुक्त दशावतार नाट्य मंडळाचे मयूरध्वज सत्वपरीक्षा हे नाटक सादर होणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दि.२७ जुलै रोजी सायं.५ वा. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार व युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त दशावतार नाट्य मंडळाचे वत्सला हरण नाटक सादर केले जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील जेष्ठ दशावतारी कलाकारांचा सत्कारमान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

रविवार २८ जुलै रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आषाढी महोत्सवाची सांगता तिरंगी भजनाच्या जंगी सामन्याने होणार आहे. हा सामना सायं.६ वा. घोटगे येथील श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा विनोद चव्हाण विरूद्ध नाडण येथील श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदीप पुजारे विरुद्ध वर्दे येथील श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे बुवा गुंडू सावंत यांच्यात होणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख, नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, पं. स. सदस्य, सरपंच व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नाट्य व भजन रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी केले आहे.