शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देणे ही भाजप नेतृत्वाची घोडचूक! सुब्रमण्यम स्वामींनी टोचले कान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
subramanian-swamy

हिंदुत्वाच्या एका विचारावर शिवसेना–भाजपची युती गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित होती. शिवसेना हा भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष राहिला आहे. मात्र शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी मान्य न करून भाजप नेतृत्वाने मोठी घोडचूक केल्याची खरमरीत टीका भाजपचे खासदार सुबमण्यम स्वामी यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात स्वामींनी भाजपला घरचाच आहेर देत भाजपच्या चाल, चरित्र आणि चेहऱयावर चांगलेच खरमरीत भाष्य करत हल्लाबोल केला आहे. हिंदुत्वाच्या व्यापक विचाराने शिवसेना-भाजपची गेल्या अनेक दशकांपासूनची युती होती. शिवसेनेने अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी सुरुवातीपासून लावून धरली होती. ही मागणी मान्य करण्यात गैर असे काहीच नव्हते. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देणे ही भाजपची मोठीच चूक होती. परिणामी भाजपने शिवसेनेसारखा सर्वात जुना मित्रपक्ष तर गमावलाच, शिवाय महाराष्ट्राच्या सत्तेवरही भाजपला पाणी सोडावे लागले, अशा शब्दांत स्वामींनी स्वपक्षीयांचे कान टोचले. सध्याचा काळ आघाडीच्या राजकारणाचा आहे. त्यामुळे शिवसेनेसारख्या सर्वात जुन्या मित्रपक्षाला अशा पद्धतीने गमावणे किंवा दूर करणे खचितच योग्य नव्हते, असे खडे बोलही सुब्रमण्यम स्वामींनी भाजपला सुनावले आहेत.

घसरलेल्या अर्थव्यवस्थेचे काय करणार
राममंदिर निर्माण होणार असल्याने भाजपकडून मिठाईचे वाटप केले जात आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र, गावखेडय़ात राहणारा सामान्य माणूस आपल्या मुलीची फीदेखील भरू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. अर्थव्यवस्था अगदी रसातळाला गेली आहे. ती कधी रुळावर आणणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अर्थव्यवस्थेच्या घसरणीचा झारखंड आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसेल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले. झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या विरोधात बंडखोरी केलेले नेते सरयू राय यांचे कौतुक करताना स्वामींनी सरयू यांच्या प्रामाणिकपणाचा भाजपने सन्मान करायला हवा, असा सल्लाही दिला.