परभणीत शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे यांची निर्घृण हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

शहरातील हाडको कॉलनीतील रहिवासी शिवसेनेच्या नगरसेवक नगरसेवक अमरदीप (भैया) रामचंद्र रोडे (३०) यांची आज सकाळी निर्घृण हत्या झाली. जायकवाडी वसाहतीतील व्यायामशाळेत मारेकर्‍यांनी कुर्‍हाडीने व दगडाने त्यांच्यावर असंख्य वार केले. त्यांचा मृतदेह छिन-विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. हा खुन केल्यानंतर दोन मारेकरी रवी गायकवाड व किरण डाके हे नवा मोंढा पोलीस ठाण्यात येऊन स्वत:हून हजर झाले. या खुनामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जायकवाडी परिसरामध्ये नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्यातच काही महिलांनी नगरसेवक अमरदीप रोडे यांना पाण्यासाठी वाद होत असून आपण तत्काळ यावे, असा फोन केला. त्यामुळे पाण्याचा वाद सोडविण्यासाठी म्हणून अमरदीप रोडे हे जायकवाडीत दाखल झाले. तेथे आधीच उपस्थित असलेल्या किरण सोपानराव डाके आणि रवी वसंतराव गायकवाड यांच्यासोबत रोडे यांचा वाद झाला. यातूनच डाके आणि गायकवाड यांनी दगड आणि कुर्‍हाडीचे घाव घालून रोडे यांना मारहाण केली. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान मारहाणीनंतर आरोपी किरण सोपानराव डाके (३४, रा. मातोश्री नगर परभणी) आणि रवी वसंतराव गायकवाड (रा. जायकवाडी परभणी) हे दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला होता.  रक्ताचा सडा झाल्याने घटनास्थळी दहशतीचे वातावरण होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी संजय परदेशी यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट दिली. ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकही घटनास्थळी दाखल झाले. अमरदीप रोडे यांचा मृतदेह सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेल्यानंतर या ठिकाणीही मोठा जमाव जमला होता. सायंकाळी उशीरा उत्तरीय तपासणी करण्यात आली. नवा मोंढा पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचे मोबाईल फोन आणि त्यातील डाटा शोधण्याचे काम चालू आए. खुनाचे आणखी काही कारण आहे काय? किंवा हत्येचा पूर्वनियोजित कट होता काय? याबाबतचा उलगडा होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.