कश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी मानवाधिकार आयोगात नेमा! शिवसेनेची राज्यसभेत मागणी

101

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

मानवाधिकार आयोग म्हणजे काय याची परिभाषा लोकांना अजून समजलेली नाही. मानवाधिकाराची भाषा आपण जेव्हा उच्चरवाने करतो त्या वेळी या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले ते कश्मिरी पंडितांचे. 30 वर्षांपूर्वी जुलूमजबरदस्ती करून कश्मिरी पंडितांना कश्मीरच्या खोर्‍यातून हुसकावून लावण्यात आले. त्यांचे पुनर्वसन करणे हाच खरा मानवाधिकार ठरेल. त्यामुळेच कश्मिरी पंडितांचे पुनर्वसन होईपर्यंत मानवाधिकार आयोगात कश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी नेमा. त्याचबरोबर देशात नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने फतवे काढले जातात. ती फतव्यांची मुजोरी मोडीत काढा, अशी आग्रही मागणी आज शिवसेनेने केली.

राज्यसभेत मानवाधिकार संशोधन विधेयकावर झालेल्या चर्चेत सहभागी होताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या विधेयकाला समर्थन देत शिवसेनेची सडेतोड भूमिका मांडली. आपल्या देशात आपण भटक्या कुत्र्यांना मारू शकत नाही, मात्र मानवाची पर्वा करत नाही. मानवाधिकार हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. आमच्या प्रतिष्ठsशी संबंधित आहे. अन्न, वस्त्र व निवारा हादेखील मानवाधिकार आहे. हा मूलभूत अधिकार का मिळाला नाही यावर आपण कधीच विचार केला नाही. आजही लोकांना अन्न मिळत नाही, राहायला घरे नाहीत. 2014मध्ये मोदी सरकार आले तेव्हापासून मानवाधिकारावर थोडेफार तरी काम सुरू केले आहे. नाहीतर मानवाधिकार आयोग म्हणजे दात आणि नखे नसलेला वाघ अशीच अवस्था होती, असे ते म्हणाले.

आज मानवाधिकाराचे सर्वाधिक उल्लंघन झालेला समाज हा कश्मिरी पंडितांचा आहे. 30 वर्षांपासून कश्मिरी पंडितांचे हाल हाल झाले. त्यांचा नरसंहार झाला. कश्मिरी पंडितांच्या बाबतीत कोणी आवाज उठवत नाहीत. या देशात काही लोक फतवे काढतात, जिहादची भाषा करतात हे मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. ही फतवेबाजी रोखा, अशी आग्रही मागणी खासदार राऊत यांनी केली.

… नाहीतर गुंडाराज येईल!

अनेकदा पोलीस आणि लष्करालाही मानवाधिकाराचे गोंडस नाव देऊन काम करू दिले जात नाही. एन्काऊंटर होतात तेव्हा एनजीओवाले कोर्टात जातात. कोर्टही गुंडाला सोडून देतात याकडे लक्ष वेधत खासदार राऊत यांनी लखनभैया खटल्याचा दाखला दिला. एका नामचीन गुंडाला मारल्याबद्दल 15 पोलीस अजूनही तुरुंगात सडत आहेत. सरकारने या बाबतीतही कडक भूमिका घेऊन मानवाधिकार आयोगात योग्य ते बदल करावेत नाहीतर गुंडाराज येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या