फेक अकाऊंटने होणारे ट्रोलिंग रोखण्यासाठी स्वतंत्र आयटी कायदा करा, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अभिनेत्री केतकी चितळे हिला फेसबुकवर अश्लील भाषेत ट्रोल करणार्‍या डमी आणि खोट्या अकाऊंटवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच आयटी ऍक्टबाबत राज्य सरकारने पावले उचलावीत अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी आज विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.

ट्रोलिंग प्रकरणी काल केतकी चितळे, सुशांत शेलार, दिगंबर नाईक यांनी आमदार गोर्‍हे यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर हा औचित्याचा मुद्दा आज उपस्थित करण्यात आला.

सोशल मीडियावर मते पटत नसल्यामुळे अगदी खालच्या पातळीवर जाऊन  विरोध केला जात आहे.  हे करताना  संयम, विवेक,  सुसंस्कृतता यासोबतच कायदेशीर जबाबदारीचे भान अनेकवेळा सुटलेले दिसत आहे. अश्लील शिव्या, अगदी बलात्काराची भाषा वापरली जात आहे. व्यक्तीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे, याकडे गोर्‍हे यांनी लक्ष वेधले. आयटी कलम 66 (अ) सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यामुळे अश्लील भाषेत ट्रोलिंग करणार्‍या मवाली लोकांचे फावले आहे. त्यामुळे आयटी कायद्यात महाराष्ट्र सरकारने  स्वतंत्र कायदा तयार करता येईल का, याबाबत माहिती घ्यावी असे गोर्‍हे म्हणाल्या.

…तर राजकीय नेतेही ट्रोल होतात

ट्रोलिंगचा अनुभव फक्त कलाकार किंवा महिलांना येत नसून विविध पक्षातील नेत्यांना येत असल्याचे  सभागृहातील सदस्यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यासाठी बैठक घेऊन आमदार, कायदेतज्ञ आणि आयटीतज्ञ यांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. याबाबत सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी अनुकूलता दर्शवली.