
गणेशोत्सव काळात गणेशभक्तांना गणेशमूर्ती विसर्जन करणे सुलभ व्हावे, यासाठी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर मित्रमंडळातर्फे मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. मालवण बंदर जेटी ते वायरी मोरेश्वर किनाऱ्यापर्यंतच्या भागात 70 जणांचे पथक कार्यरत असून या वर्षीच्या गणेशोत्सवात आतापर्यंत शेकडो गणेशमूर्तींचे मोफत व योग्य पद्धतीने विसर्जन या मित्रमंडळाने केले आहे. या उपक्रमाबाबत सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे.
मालवणच्या किनारपट्टीवर गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. काहीवेळा गणेश विसर्जन करतेवेळी दुर्घटना घडतात. बुडून मृत्यू झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी तसेच गणेश भक्तांना सुलभ व योग्य पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन करता यावे, या उद्देशाने हरी खोबरेकर यांनी आपल्या मित्रमंडळाच्या माध्यमातून किनारपट्टीवर मोफत गणेशमूर्ती विसर्जन सेवा सुरू केली आहे. मालवण बंदर जेटी ते वायरी मोरेश्वर या किनारी पट्ट्यात ही सेवा देण्यात येत आहे.
या मित्रमंडळात सुमारे 70 सदस्यांचा समावेश आहे. किनारी भागातील घरांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींचे समुद्रात विनामूल्य विसर्जन करण्यात येत आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवात दीड दिवस, पाच दिवस, सहा दिवस, सात दिवस व नऊ दिवसांच्या शेकडो गणेश मूर्तींचे विसर्जन हरी खोबरेकर मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे. विसर्जन सेवेबरोबरच गणेश मूर्तींसोबत असणारे फुलपत्री, फुले, हार यांचे निर्माल्याचीही योग्य ती विल्हेवाट या मित्रमंडळाकडून लावण्यात येत असून याद्वारे किनारा स्वच्छतेचे कामही त्यांच्या कडून होत आहे. या उपक्रमाबाबत गणेश भक्तांकडून समाधान व कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.




























































