
सामना ऑनलाईन । मुंबई
अनेक ठिकाणी खेटा मारल्या, चपला झिजवल्या, पण नोकरी काही मिळाली नाही. कंपन्यांमध्ये जागा आहेत पण त्यासाठी लायक उमेदवार नाही. ही तफावत आज बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात दूर झाली. हजारो तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मेळाव्याला लाभला. महिंद्रा, अॅमेझॉन, पेटीएम यासारख्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर दिलेल्या मुलाखतींनंतर ‘ऑन द स्पॉट’ मिळालेल्या नोकरीने या तरुणांचे आयुष्यच बदलून गेले.
गोरेगाव येथील नेस्को संकुलात ‘बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या उद्योग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. परिस्थितीवर मात करीत पुढे जाण्याची जिद्द ठेवणाऱया दिव्यांगांनाही या मेळाव्याने नोकरीची संधी उपलब्ध झाली. हजारो तरुणांना नियुक्तीची पत्रे मिळाली तर काहींना पुढील मुलाखतीची तारीख मिळाली. या रोजगार मेळाव्यात अडीच हजार मुला-मुलींना हजेरी लावली. त्यातील 1611 जणांना नोकरीसाठी पात्र ठरवण्यात आले. त्यापैकी 310 जणांना तत्काळ नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आज प्राथमिक स्तरावर मुलाखती झालेल्या असल्या तरी उर्वरित मुला-मुलींना पुढील आठवडय़ात बोलावून पुन्हा मुलाखती होणार आहेत. पुढील तीन आठवडे ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई इमारत व दुरुस्ती महामंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिक सतीश गवई, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, सीआयआयचे सतीश खन्ना आदी उपस्थित होते.
नोकरी देणारे आणि मागणारे यांच्यात मेळ घातला – सुभाष देसाई
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा ही संकल्पना खरं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे. महाराष्ट्रात उद्योग आल्यानंतर ते उद्योग आपल्या मुलांना नोकरी देतात का हे पाहिले पाहिजे. उद्योजकांशी चर्चा करताना कुशल मनुष्यबळाविषयी तक्रारी करतात. नोकरी देणारे आहेत. सोबत नोकरी मागणारेदेखील आहेत, या मेळाव्याच्या माध्यमातून दोघांचा मेळ घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असे शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
अभ्यासक्रमात बदल आवश्यक
उद्योग नोकऱया निर्माण करते, परंतु कुशल कामगार निर्माण करणे माझ्या खात्याचे काम आहे. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत जुना अभ्यासक्रम सुरू होता. त्यात बदल करण्यास सुरुवात केली आहे. ज्या पुस्तकांची आम्हाला गरज, ज्यातून आमचे पोट भरले जाणार आहे तशा पद्धतीने पुस्तक बदलण्याची गरज आहे. हा बदल झाल्यास उद्योगांना कुशल कामगार मिळू शकतील, असे वायकर म्हणाले.
दिव्यांगांचाही प्रतिसाद
या रोजगार मेळाव्यात दिव्यांगांसाठीही रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केली होती. त्यानुसार रोजगार मेळाव्यात दिव्यांगांच्या नोकऱयांसाठीही विशेष कक्ष तयार करण्यात आला होता.
भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसांसाठी बंद झालेली सरकारी नोकऱयांची कवाडं शिवसेनेने पुन्हा खुली केली. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेकांच्या हाती नोकऱयांची नियुक्तीपत्रे मिळतील़ घर चालविण्याची नव्हे तर आयुष्याची किल्लीच त्यांना मिळणार आहे.
– उद्धव ठाकरे



























































