शिवसेनेमुळे कांदिवलीतील ड्रेनेज-चेंबरचा प्रश्न सुटला, हजारो रहिवाशांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुटलेले चेंबर आणि ड्रेनेज लाइनमुळे हैराण झालेल्या कांदिवलीतील हजारो रहिवाशांना अखेर शिवसेनेमुळे दिलासा मिळाला आहे. विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, नगरसेविका शुभदा गुढेकर यांच्या पाठपुराव्यातून पालिकेने कांदिवली पश्चिममध्ये तातडीने ही कामे केल्याने रोगराईला आळा बसणार आहे.

कांदिवली पश्चिम येथील वॉर्ड क्र. 20 व 21 परिसरात हिंदुस्थाननाका, मारुती नगर, दिग्विजय नगर, महाराष्ट्र नगर, दुर्गा निवास आणि शिवशक्ती कंपाऊंडसारख्या भागात ड्रेनेज लाइन तुटल्याने सांडपाणी वसाहतीत शिरत होते. त्यामुळे या भागात दुर्गंधी, रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर रहिवाशांकडूनही या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात येत होती. याची दखल घेत विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांनी पुढाकार घेऊन वर्सोवा ड्रेनेज कंट्रोल विभागाचे प्रमुख अधिकारी उबाळे, सहायक आयुक्त संजय कुर्‍हाडे, डीएमसी शंकरवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे हे काम तातडीने सुरू करण्यात आले. याशिवाय विभागातील न्यू लिंक रोडजवळ मेट्रो कामात तुटलेल्या ड्रेनेज लाइनही दुरुस्त करण्यात आली. या ठिकाणीही सुधाकर सुर्वे यांच्या प्रयत्नाने वसाहतीत साचणारे पाणी काढण्यासाठी चार पंप बसवण्यात आले आहेत. यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांचीही दुर्गंधीच्या त्रासातून सुटका झाली आहे. मुंबईसह देशभरात लॉकडाऊन असतानाही शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांच्या हितासाठी करण्यात आलेल्या कामामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.