
बेळगावात मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. या अत्याचारांची कुणी दखल घेत नसेल तर मग महाराष्ट्र सरकारला पूर्ण ताकदीने बेळगावात उतरावे लागेल. डोकी फुटली तर केंद्राकडे रडत जाऊ नका, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कन्नडिगांना दिला आहे. कर्नाटकमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
बेळगाव हा या देशाचाच भाग आहे. जर कर्नाटकातील लोक मुंबई, महाराष्ट्रात येऊ शकतात आणि मराठी माणसाला बेळगावात येताना विरोध का? राष्ट्रीय एकात्मता आम्ही मानतो आणि तितकीच जबाबदारी कर्नाटक सरकारचीसुद्धा आहे. जर कठोर पावलं उचलायला आम्हाला भाग पाडलं तर ती सरकारी नसतील. ती पावलं राजकीय असतील. मग डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
पंतप्रधान, गृहमंत्री गप्प का?
बेळगावमध्ये मागील आठ दिवसांपासून तेथील मराठी लोकांवर हल्ले सुरू आहेत. शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. हे अत्यंत चिंताजनक आहे. पश्चिम बंगालमध्ये हल्ले झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंता व्यक्त करतात, पण जेव्हा बेळगावात मराठी माणसांवर हल्ले होतात तेव्हा मात्र पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा गप्प का, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजप नेत्यांना केला आहे.
सर्वपक्षीय शिष्टमंडळ बेळगावला पाठवा
बेळगावात सुरू असलेली दडपशाही एका राजकीय पक्षाचा किंवा सरकारचा विषय नाही. हा हिंदुस्थान-पाकिस्तानचा नाही, तर देशांतर्गत मुद्दा आहे. पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला तर हा जो भाषावादाचा मुद्दा आहे तो शांततापूर्ण पद्धतीने संपू शकतो. या विषयात राज्यातून एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ तत्काळ बेळगावला पाठवायला हवे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.





























































