
अडचणीच्या वेळी कुटूंबाला आधार देणारी महिलाच असते. महिला भगिनींचा सन्मान, आदर करणारी संघटना म्हणजे शिवसेना आहे. महिला, युवती यांच्या रक्षणासाठी शिवसैनिक बांधव सदैव सज्ज असतात. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी शिवसेनेने मोठे काम केले आहे. त्यामुळे रक्षणकर्त्या शिवसेनेच्या पाठीशी महिला भगिनींनी ठामपणे उभे राहावे असे जोरदार आवाहन शिवसेनेच्या वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी वसमत व औंढा नागनाथ येथे शिवसेनेच्या वतीने आयोजीत प्रथम ती महिला मेळाव्यात बोलतांना केले.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघाचा वसमत येथे तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचा औंढा नागनाथ येथे शिवसेनेचा प्रथम ती महिला मेळावा पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शक म्हणुन शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, मुंबईच्या कविता गावंडे, शिल्पा देशमुख यांची उपस्थिती होती. वसमत व औंढा येथे मार्गदर्शन करतांना खासदार भावना गवळी म्हणाल्या की, मराठी माणसाला सक्षमपणे उभे करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करुन न्याय देण्याचे काम केले आहे. हाच समर्थ वारसा घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सक्षमपणे शिवसेनेची धुरा सांभाळत आहेत. शिवसेनेने कायमच महिलांना आदर व सन्मानाची वागणुक दिली आहे. महिलांनी शिवसेनेच्या भगव्याखाली एकत्र येऊन समाजकारणासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या माध्यमातून फक्त छोटी स्वप्ने न पाहता मोठे स्वप्न ठेवुन समाजकारण व राजकारणात महिलांनी कार्यरत व्हावे. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने पहिल्यांदा मी खासदार झाले. आता पाचव्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संधी दिली आहे. एखाद्या कुटूंबातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केली तरीही डगमगुन न जाता कुटूंबाला सावरण्याचे काम महिला करत असते. संसाराचा गाडा चालवितांना काटकसरीने पैशाची साठवणुक देखील महिला करतात. पतीला जेव्हा अडचण येते तेव्हा साठवलेले हे पैसे देणारी हक्काची घरची बँक म्हणजे महिलाच असून महिला भगिनींनी शिवसेनेला साथ देऊन पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कविता गावंडे व शिल्पा देशमुख यांनी शिवसेनेच्या माध्यमातून होत असलेले समाजकार्य, महिलांच्या विषयीचे कार्य याबाबत मार्गदर्शन केले. वसमत येथील मेळाव्याला आयोजक तथा शिवसेना आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, रितादेवी मुंदडा, शिवसेनेच्या नगरसेविका तसेच शहर व तालुक्यातील महिला भगिनी, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर औंढा नागनाथ येथील मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आयोजक संतोष बांगर, नगराध्यक्षा सविता सतीश चोंढेकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका जया अनिल देशमुख, अलका कुरवाडे यांच्यासह महिला भगिनींनी मोठी उपस्थिती लावली होती. औंढा येथील मेळाव्यात खासदार भावना गवळी, कविता गावंडे, शिल्पा देशमुख यांचा बंजारा समाजातील महिला भगिनींनी पारंपारिक वेशभुषेमध्ये सत्कार केला.



























































