
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण लागू करणारा अध्यादेश काढावा, अशी मागणी शिवसेना कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली. उद्या दुपारी चार वाजेपर्यंत शासनाने अध्यादेश काढला नाही तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, स्व. काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबांना ५० लाखांची मदत द्यावी, सुशिक्षित बेरोजगारांना मुद्रा लोण उपलब्ध करून द्यावे या व अन्य मागण्यांसाठी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार अध्यादेश काढू शकते, मात्र त्यात वेळकाढूपणा होत असल्याने समाजात असंतोष पसरला आहे. त्यातून काल कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने सरकारच्या निषेधार्थ जलसमाधी घेतली. त्यांच्या कुटुंबीयांना कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री पंकजा मुंडे एका दिवसात ५० अध्यादेश काढू शकतात, मग सरकारला एक अध्यादेश का काढता येत नाही, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. मराठा आरक्षणाचा अध्यादेश बुधवारी चार वाजेपर्यंत निघाला नाही तर विधानसभा अध्यक्षांकडे आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.



























































