
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे कुडाळ तालुका कृषी विभाग अंतर्गत कार्यक्रमात गुरूवारी थेट शेती शिवारात उतरले. माणगांव आंबेडकर नगर येथील शेतकरी लवू कदम यांच्या शेतात श्री पद्धतीने भात लावणीचे प्रात्यक्षिक तसेच लक्ष्मण कदम यांच्या श्री भात लावणी मध्ये कोनोविडरच्या साहाय्याने कोळपणीचे प्रात्यक्षिक वैभव नाईक यांनी करीत शेतक-यांच्या समस्याही जाणून घेत त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
माणगांव खो-यात कुडाळ तालुका कृषी विभागाअंतर्गत झालेल्या लागवडीबाबत कृषी विभागाचे कौतूक केले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, महिला आघाडी जिल्हा संघटक जान्हवी सावंत, जि.प.सदस्य राजू कवीटकर, उपसभापती श्रेया परब, पं. स. सदस्या मथुरा राऊळ, शरयू घाडी, माजी जि.प.सदस्य रमाकांत तामाणेकर, माजी पं.स.सदस्य अतुल बंगे, विभाग प्रमुख बबन बोभाटे, तालुका कृषि अधिकारी रमाकांत कांबळे, कृषि पर्यवेक्षक निलेश उगवेकर, कृषि सहाय्यक प्रशांत कुडतरकर, पंकज बाविस्कर, अॅन्थाॅनी डिसोझा, उमेद अभियानच्या कृषि व्यवस्थापिका रसिका राणे, कृषि सखी गौतमी कांबळे, पशू सखी संजना कदम, सुजाता कदम व शेतकरीवर्ग उपस्थित होता. कृषी अधिकारी कांबळे व पर्यवेक्षक उगवेकर यांनी लागवडीबाबत माहीती दिली.


























































