कितीही वेळा अटक करा, भगवा सोडणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मला कितीही वेळा अटक करा. मी शिवसेनेला त्यागणार नाही. हा भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलोय. त्या भगव्याबरोबरच मी जाईन, असे सांगतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी  ‘मला अटक करून किती मोठी चूक केली आहे हे आता त्यांना कळेल’, असा थेट इशाराच विरोधकांना दिला.

ऑर्थर रोड तुरुंगातून सुटका झाल्यानंतर खासदार संजय राऊत हे त्यांच्या भांडुप येथील घरी रात्री उशिरा दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी भांडुप येथील निवासस्थानी शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. यावेळी शिवसैनिकांना संबोधित कराताना संजय राऊत म्हणाले, आज घरी आल्यानंतर मला वाटलं की, शिवतीर्थावरच आलो. दसरा मेळावा चुकला होता. मी आपल्या सगळय़ांचा आभारी आहे. 100 दिवसांनंतरही तुम्ही माझं स्मरण ठेवलंत. मी तुमचा आभारी आहे.  माझ्या सुटकेनंतर मी पाहिले की, फक्त भांडुप पिंवा मुंबई नाही तर महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांमध्ये आनंद झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कसा असतो हे महाराष्ट्राने, देशाने पाहिले, असे सांगतानाच महाराष्ट्रात आपल्याच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

मशाल भडकलेली आहे

गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये शिवसेना तोडण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण ती तुटलेली नाही. ही अभेद्य शिवसेना आहे. ही बुलंद शिवसेना आहे हे अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या विजयाने  तेच दाखवून दिले. मशाल भडकलेली आहे. एकच शिवसेना महाराष्ट्रात राहील. ती म्हणजे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

मुंबई पालिकेसाठी शिवसेना फोडली

माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले. ‘इसको अंदर डालो, तो सरकार आ जायेगी.’ आता खोक्यांची गोष्ट चालली आहे. महाराष्ट्रातले बोके खोक्यांवर बसलेले आहेत. आता फक्त ओके शिवसेना. मात्र शिवसेना काय ते दाखवून देईल. शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंचीच. गद्दारांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. मुंबई महानगरपालिका, मुंबई आपल्या हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली आहे हे लक्षात घ्या, असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना एकच… बाकी सगळय़ा धोत्र्याच्या कडू बिया

शिवसेना एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली आणि उद्धव ठाकरेंचे नेतृत्व असलेली शिवसेनाच खरी शिवसेना आहे. बाकी सगळ्या धोत्र्याच्या कडू बिया आहेत, असे सांगताना ही मुंबई आणि महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे, ते लवकरच कळेल, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.

उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा

संजय राऊत सायंकाळी पावणेसातच्या सुमारास आर्थर रोड कारागृहातून बाहेर आले. यावेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसैनिकांनी जल्लोषात राऊत यांचे स्वागत केले. यावेळी राऊत माध्यमांशी बोलले. जामिनाच्या निकालानंतर माझा न्यायालयावरचा विश्वास वाढला आहे. न्यायव्यवस्था, घटना, कायदा जिवंत आहे, हेच यातून दिसून आले आहे, असे राऊत म्हणाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझे फोनवर बोलणे झाले. माझ्याशी बोलताना त्यांचाही कंठ दाटून आला होता, असे राऊत यांनी नमूद केले.

लढत राहणार!

जामिनावर सुटका झाल्यानंतर संजय राऊत यांनी न्यायालयाचे आभार मानले. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे आणि आज जो निकाल आला आहे त्यासाठी मी न्यायालयाचा आभारी आहे, असे राऊत म्हणाले. मी लढणारा आहे, हार मानणार नाही. यापुढेही लढत राहणार, असा निर्धार राऊत यांनी केला.