
भ्रष्टाचाराचा एक जरी रुपया, चुकीचा पैसा माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या खात्यावर आला असेल तर संपूर्ण संपत्ती भाजपाच्या खात्यावर जमा करायला मी तयार आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या मालमत्ताजप्तीच्या कारवाईनंतर शिवसेनानेते, खासदार संजय राऊत यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. ‘मी तुमच्या बापालाही घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि आजही मला त्यांचे आशीर्वाद आहेत,’ अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी भाजपाला ठणकावले. डोक्यावर बंदूक ठेवलीत तरी हा संजय राऊत घाबरणार नाही हे लक्षात ठेवा, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
ईडीच्या कारवाईनंतर खासदार संजय राऊत यांनी तातडीने ‘असत्यमेव जयते’ अशी आपली पहिली प्रतिक्रिया ट्विटरवर दिली. त्यानंतर नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ईडीची कारवाई, भाजपा आणि किरीट सोमय्या यांचा चांगलाच समाचार घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘ईडी माझ्या मागे लागणार, सीबीआय लागणार याची पूर्ण कल्पना मला होती. व्यंकय्या नायडू यांना मी पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव येतोय आणि दबाव टाकणाऱयांना मदत केली नाही तर केंद्रीय यंत्रणा मागे लागतील, अटकही करू अशा धमक्या दिल्या जात आहेत असे मी त्यात नमूद केले होते. मला ईडीच्या कारवाईचे आश्चर्य वाटत नाही. अशा कारवाईने शिवसेना किंवा संजय राऊत कधीच खचणार नाही. पण सूडाच्या कारवाया, असत्यासमोर आम्ही कधीही गुडघे टेकणार नाही.’
…तर संपूर्ण संपत्ती भाजपाच्या खात्यावर जमा करेन
ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांबद्दलही संजय राऊत यांनी यावेळी खुलासा केला. ‘कष्टाने कमावलेली ती संपत्ती ईडीने जप्त केली. हा राजकीय दबाव आहे. माझी संपत्ती काही नाही, जमिनीचा तुकडा आणि राहतं घर याला संपत्ती म्हणत असाल तर संपत्तीची व्याख्याच बदलावी लागेल. माझे राहते घर फार तर 2 रूम किचन एका मराठी माणसाचे घर, एका मध्यमवर्गीय माणसाचे घर आहे. अलिबाग माझे गाव, तेथे साधारणपणे 50 गुंठय़ाची जमीन 2009मध्ये घेतली आहे. याला कुणी संपत्ती म्हणत असेल तर मराठी माणसासाठी तेवढी संपत्ती आहे. भ्रष्टाचाराचा एक जरी रुपया, चुकीचा पैसा माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या खात्यावर आला असेल तर संपूर्ण संपत्ती भाजपाच्या खात्यावर जमा करायला मी तयार आहे, असे संजय राऊत म्हणाले.
भाजपाच्या देणगीदारांची ईडीने चौकशी केली पाहिजे
‘भाजपा हे भिकारी लोक आहेत. त्यांच्याकडे काही नाही. त्यांचे जे देणगीदार आहेत ना त्यांची ईडीने चौकशी केली पाहिजे. मात्र आमच्यासारख्या मराठी मध्यमवर्गीय माणसांवर कारवाई होतेय, पण फरक पडत नाही. अशा कारवाया करत राहायला हवे. महाराष्ट्रातील जनतेला हे कळायला हवे की, अशा कारवाया सुरू आहेत,’ असे संजय राऊत म्हणाले.
हरेन पंडय़ाप्रमाणे मला गोळी माराल तर ती तुमच्यावरच उलटेल
‘ईडीच्या कारवाईमुळे मी मौनात नाही जाणार, ते जातील. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. माझ्या धमन्यांमध्ये शिवसेना आहे. काय करणार तुम्ही? माझ्या डोक्याला बंदूक लावाल ना? मी वॉकला जातो तेव्हा हरेन पंडय़ाप्रमाणे मला माराल, गोळी माराल…माझं चॅलेंज आहे, गोळी तुमच्यावरच उलटेल,’ असे संजय राऊत म्हणाले.
तुम्हाला फाटय़ावर मारतो, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे!
‘तुम्ही कितीही कारवाया करा, आम्ही सगळे कुटुंबीय खंबीर आहोत, मराठीत बोलायचे झाले तर आम्ही तुम्हाला फाटय़ावर मारतो. शिवसैनिक आहे मी बाळासाहेब ठाकरेंचा, मर्द मराठी माणूस आहे. काय कराल तुम्ही? हे ईडी, सीबीआयचे भाडोत्री भाजपाने लावले आहेत ना, या खोटेपणाला संजय राऊत घाबरत नाही. तुम्ही तुमची कबर खोदायला सुरुवात केली आहे. जे खोटं कराल ते तुमच्यावर उलटवल्याशिवाय राहणार नाही,’ असा थेट इशाराच संजय राऊत यांनी यावेळी दिला.
घरातून बाहेर काढले हा सूड आहे
‘घरातून बाहेर काढले हा सूड आहे. म्हणजे हा सूड मराठी माणसावर घेतला जात आहे. इतके खालचे राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते. कायद्याने राहते घर जप्त करता येत नाही. 2009 मध्ये घेतलेल्या जमिनीवर कारवाई होतेय. दादरमधील जागेच्या व्यवहाराबाबत राज्यसभेच्या प्रत्येक प्रतिज्ञापत्रात मी नमूद केले आहे. आमच्यावर 55 लाखांचे कर्ज असल्याचेही दाखवले आहे. प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून ते कर्ज घेतले होते. ते पैसे परतही केले. त्याबाबत इन्कम टॅक्सलाही कळवले,’ असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
मुंबई मराठी माणसाची आहे, दामदुपटीने वसूल करू!
‘प्रॉपर्टी करणे हा आमचा धंदा नाही, तो तुमचा आहे. महाराष्ट्रात कुणी कष्टाने, हक्काने दोन गोष्टी घेत असेल त्यावर हे अमराठी लोक आक्षेप घेत असतील तर मुंबई मराठी माणसाची आहे, दामदुपटीने वसूल करू,’ असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. ‘नेमका व्यवहार काय झाला ते पाहायला हवे. आम्हाला विचारायला हवे. व्यवहार पाहायला हवा. आम्हाला विचारायला हवे. ते न करता तुम्हीच ठरवता, तुम्ही कोण ठरवणार? तपास केला का? कायद्याने अमर्याद अधिकार दिले आहेत त्याचा गैरवापर करता…करा. या देशात सैतानाचा, राक्षसांचा अंत झाला. रावण, पंस, अफझल खान…सगळे मरण पावले, कुणीही जिवंत नाही. मी लढणारा माणूस आहे. प्रॉपर्टी, संपत्ती गौण आहे. माझा पक्ष शिवसेना आणि लोकांचे समर्थन हीच माझी संपत्ती आहे,’ असे संजय राऊत म्हणाले.
आरोप करणारे तोंडावर आपटतील
संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘पत्राचाळ काय आहे मला माहीत नाही. त्यांना सिद्धच करायचे आहे, त्यामुळे चार्जशीटमध्ये ते काहीही टाकू शकतात. मेहुल चोक्शी पंतप्रधानांसमोबत परदेश दौऱयावर गेले तर आम्ही पंतप्रधानांशी त्यांचे नाव जोडायचे का? तुम्ही कोणतेही नाव जोडत असाल तर नीट अभ्यास हवा. मी त्यात पडत नाही. जे पडत आहेत त्यांना पडू द्या. ते तोंडावर आपटतील. या देशात खोटय़ा केसेस, खोटे पुरावे कधी निर्माण झाले नव्हते ते आता होत आहेत.’
























































