
माथाडी, हमाल, खासगी सुरक्षा रक्षक सुधारणा विधेयकाच्या चर्चेच्या निमित्ताने आज सभागृहात आशीष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यात जोरदार जुंपली. विधिमंडळात तुमचा पक्ष कुठे आहे, असा सवाल शेलार यांनी करताच भास्कर जाधव संतापले आणि मूळ शिवसेना आमचीच, असे ठणकावून सांगितले. शिवसेना असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो या माध्यमातून संपूर्ण लोकशाही संपवण्याचे काम सुरू असल्याचे सडेतोड उत्तरही भास्कर जाधव यांनी भाजपला दिले.
महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि खासगी सुरक्षा रक्षक सुधारणा विधेयक 2023 दोन्ही सभागृहांच्या 21 जणांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव विधानसभेत सादर झाला. यासाठी 21 सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे.
या समितीमध्ये शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रतिनिधित्व दिले नाही, असा आक्षेप भास्कर जाधव यांनी घेतला. विधिमंडळाच्या समित्यांमध्ये सत्ताधारी पक्षाचे किती सदस्य, विरोधी पक्षाचे किती सदस्य घ्यावेत असे निश्चित असते. आमचा तर एकही सदस्य नाही. विधान परिषदेतील फक्त सचिन अहिर यांना घेतले आहे. विधानसभेतील एकही सदस्य नाही. सदस्य संख्येच्या प्रमाणात किती सदस्य घ्यावेत असे प्रमाण असते. असे काही असते किंवा नाही हे याची माहिती देण्याची मागणी भास्कर जाधव यांनी केली.
त्यावर विधिमंडळात तुमचा पक्ष आहे कुठे? त्याला पक्ष अशी मान्यता आहे का? पक्षाचा गटनेता-प्रतोद आपण नेमला आहे का? तुमचा पक्षच अदष्य असल्याचे ते म्हणाले. त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव प्रचंड संतापले. उभे राहून त्यांनी आशीष शेलार यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली. निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला त्याचा संबंध इथे नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की, मुख्य प्रतोद सुनील प्रभू आहेत, भरत गोगावले नाहीत. सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग मोठा नाही आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा आशीष शेलारही मोठे नाहीत. शिवसेना, राष्ट्रवादी अख्खी लोकशाही संपविण्याचे काम चालले असल्याचे अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी सुनावले.


























































