
सामना ऑनलाईन । मुंबई
केबल आणि इंटरनेट व्यवसायात शिरकाव करून राज्यातील हजारो केबल चालकांना उद्ध्वस्त करण्याचा रिलायन्स जिओचा डाव आहे. मात्र वर्षानुवर्षे इमानेइतबारे आपला व्यवसाय करणार्या केबल चालकांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा रिलायन्सचा हा डाव हाणून पाडू, असा इशारा आज केबल ऑपरेटर डिस्ट्रिब्युशन असोसिएशनचे अध्यक्ष व शिवसेना विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब यांनी दिला आहे. त्यासाठी शिवसेना कायदेशीर लढाईबरोबरच रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात दहा हजारांहून अधिक मोठे केबल चालकांकडून विभागनिहाय सेवा देणार्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. या केबल चालकांनी आपल्या ताकदीने ग्राहकांच्या घरापर्यंत केबलचे जाळे उभारले आहे. पण आता रिलायन्स जिओने फायबर केबल नेटवर्क उभारून या केबल चालकांना देशोधडीला लावण्याचा घाट घाटला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अॅड. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन रिलायन्स जिओच्या धोरणाला विरोध दर्शवला. स्पर्धेच्या नावाखाली ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी कोणी काही दिवस फुकट सेवा देऊन इतरांचे कंबरडे मोडणार असेल तर ते सहन करणार नाही. रिलायन्स जिओ कोणाला विस्थापित करून आपला धंदा करणार असेल तर शिवसेना त्यांचा धंदा चालू देणार नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.
2003 मध्ये शिवसेनाप्रमुखांमुळेच केबल व्यवसाय वाचला
केंद्र सरकारने 2003 मध्ये कंडिशन अॅक्सेस सिस्टम (सीएएस)आणली होती. त्यामुळे देशातील केबल चालक उद्ध्वस्त होणार होता. तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध करत सीएएस सिस्टम मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यामुळे संकटात आलेला केबल व्यवसाय वाचला होता. तीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असल्याचे अॅड. अनिल परब यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी केबल चालकांची रंगशारदामध्ये बैठक
रिलायन्स जिओ केबल आणि इंटरनेट व्यवसायात येत असल्याने केबल चालक देशोधडीला लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवार, 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता राज्यातील प्रमुख केबल चालकांची बैठक वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात होणार आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केबल चालकांना मार्गदर्शन करणार असल्याचे आमदार अॅड. अनिल परब यांनी सांगितले.






















































