पुनंदमधून जलवाहिनी नेण्यास शिवसेनेचा विरोध, जलवाहिनीचे पाईप तालुक्यात उतरू देणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सटाणा

सटाणा नगरपालिकेच्या पुनंद प्रकल्प पाणीपुरवठा योजनेचे 10 फेब्रुवारी रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन केले. योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेने या योजनेला विरोध करून जलवाहिनीचे पाईप तालुक्यात उतरू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

कळवण तालुक्यातील जनतेचा रोष पत्करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या योजनेचे भूमिपूजन केल्याने तालुक्यात नाराजी पसरली आहे. या प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन जलवाहिनी काय, पण एक पाईपसुध्दा कळवण तालुक्यात उतरू देणार नाही. तालुक्यातील शेतकरी बांधवाना बरोबर घेऊन जनआंदोलन करू व ही योजना व निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू, असा इशारा शिवसेनेचे कळवण-सुरगाणा विधानसभा संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील, तालुका प्रमुख अंबादास जाधव यांनी दिला आहे.

पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही. जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आमचा विरोध आहे, त्यामुळे जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका तालुक्यातील शेतकरी बांधवांची असून तालुक्यासाठी जनतेबरोबर शिवसेना असल्याने जनतेच्या भावना समजून शासनाने निर्णय घ्यावा अशी शिवसेनेची मागणी आहे.

कळवण तालुक्यासह देवळा, सटाणा तालुक्यात आमचेच नातेवाईक राहात आहेत. त्यांना पिण्यासाठी पाणी देण्यास शिवसेना अथवा तालुक्यातील शेतकरी बांधवांचा विरोध नाही. परंतु ज्या उद्देशाने कळवण तालुक्यात धरणे बांधली आहेत. त्या शेतीसाठी पाणी आरक्षित करावे व उर्वरित पाणी सुळे डावा कालवा किंवा पुनंद नदीतून घेऊन जावे. थेट जलवाहिनीने पाणी नेल्यास शेतकऱ्यांची बागायती शेती उद्ध्वस्त होऊन कोरड शेतीत रूपांतर होईल.
-अंबादास जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख