बेकायदा फीवाढ ताबडतोब मागे घ्या! ‘रुस्तमजी ट्रुपर्स’ शाळेला शिवसेनेचा अल्टिमेटम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दहिसर येथील रुस्तमजी ट्रुपर्स स्कूलच्या बेकायदा फीवाढीविरोधात शिवसेना-युवासेनेने आज जोरदार आंदोलन केले. यावेळी अन्यायकारक फीवाढीबद्दल शाळा प्रशासनाला धारेवर धरून शुल्कवाढ मागे घेण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. फीवाढीबाबत शाळेने ताबडतोब निर्णय घ्यावा अन्यथा पुन्हा तीक्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

रुस्तमजी ट्रुपर्स स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळेच्या अनेक अनियमितता व लेखी तक्रारी पालकांनी शिवसेना व युवासेनेकडे दाखल केल्या होत्या. या शाळेत इ. पहिलीच्या शाळा शुल्कामध्ये 10 टक्के वाढ पालक-शिक्षक संघटनेच्या सहमतीने 2016 मध्येच मान्य करण्यात आलेली होती. ही वाढ शाळेने इयत्ता पहिलीच्या शुल्कावर करणे अपेक्षित होते, परंतु शाळेने ही फीवाढ सीनियर के.जी. च्या शुल्कावर केली. तसेच दुसरी ते पाचवी इयत्तेमध्ये नियमबाह्य पद्धतीने शुल्कवाढ करण्यात आली. शाळेकडे यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही शाळा प्रशासनाने फीवाढ मागे घेतली नाही. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना-युवासेना विभाग क्र. 1 तर्फे शाळेवर जोरदार आंदोलन करण्यात आले. याबाबत आठ दिवसांत निर्णय घ्यावा असा अल्टिमेटम शाळा प्रतिनिधी प्रवीण शेट्टी यांना देण्यात आला. विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आमदार प्रकाश सुर्वे, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, प्रभाग समिती अध्यक्षा रिद्धी खुरसुंगे, नगरसेविका शीतल म्हात्रे, तेजस्विनी घोसाळकर, सुजाता पाटेकर, संध्या दोशी, गीता सिंघण, हर्षद कारकर, उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, सुनील डहाळे, विनायक सामंत, दामोदर म्हात्रे आदींसह मोठय़ा संख्येने शिवसैनिक, पालकवर्ग उपस्थित होते.

अशी केली नियमबाह्य फीवाढ

शुल्कवाढीची गंभीर दखल घेत शिवसेनेकडून शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार करून संबंधित शाळेच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या चौकशी अहवालामध्ये शाळेने सादर केलेल्या माहितीनुसार सन 2016-17 मध्ये इयत्ता पहिलीची फी 32,760 रुपये व सन 2017-18 मध्ये 36,050 रुपये असून ही वाढ मागील वर्षाच्या फीमध्ये 10 टक्के व सन 2018-19 मध्ये फी 50,400 रुपये असून ही वाढ मागील वर्षाच्या 40 टक्के केल्याचे समोर आले.