
तब्बल 70 वर्षांनी देशाच्या राजधानीत झालेल्या साहित्य उत्सवाची आज सांगता झाली. राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या दिल्लीतील साहित्य संमेलनाचे राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत सूप वाजले. महामंडळाच्या हातातून गेलेल्या आणि पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या संमेलनावर सुरुवातीपासूनच टीका होत आहे. अशातच अखेरच्या दिवशी साहित्य मंचाचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचा संतापजनक प्रकार घडला. याबद्दल सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त झाली.
संमेलनाच्या अखेरच्या दिवशी ‘असे घडलो आम्ही’ या मुलाखतपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मिंधे गटाच्या आमदार आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नमकहरामी करत शिवसेनबद्दल आक्षेपार्ह वक्त्यव्य केले. शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असे माझे निरीक्षण आहे, अनुभव नाही, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले.
नीलम गोऱ्हे यांच्या विधानाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात गोऱ्हे यांच्या विरुद्ध शिवसैनिकांनी उग्र आंदोलन केले. पुण्यात गोऱ्हे यांच्या घरावर धडक देत शिवसेनेच्या रणरागिणींनी जोडे मारो आंदोलन पेले. टायरवाल्या कापूंचे करायचे काय… गद्दार नीलम गोऱ्हे हाय हाय अशा घोषणा देत पोस्टर पायी तुडवण्यात आले. महिला आघाडीच्या रेखा कोंडे, विजया मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न – युवराज शाह
नीलम गोऱ्हे आधी का नाही बोलल्या. प्रसिद्धीसाठी त्यांनी अट्टहास केला. इथे पॅमेरा, माईक सगळं होतं. ते बघून त्यांनी मौके पे चौका मारला. स्वार्थासाठी त्यांनी व्यासपीठाचा गैरवापर केला. आम्ही त्यांच्या मताशी सहभागी नाही, असे मत संयोजन समिती सदस्य युवराज शाह यांनी व्यक्त केले.
साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही : संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांना खुले पत्र लिहिले. त्यात दिल्लीत साहित्य संमेलन साजरे झाले त्याबद्दल अभिनंदन करतानाच संजय राऊत यांनी साहित्य संमेलनातून नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या राजकीय चिखलफेकीचा जाब तांबे यांना विचारला. साहित्य संमेलनात चर्चेला आलेले अनेक चर्चासत्रे आणि परिसंवाद साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन आणि त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही, असे संजय राऊत यांनी नमूद केले. नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानावर पत्रकारांना सांगितले की, ‘मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन कार्यक्रमात सहभागी झाले व उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन कार्यक्रमांचे आयोजन करायला लावले,’ हे खरे की खोटे माहित नाही. पण महामंडळाच्या प्रतिमेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
सुसंस्कृत वाटत होते ते आता सर्वात घाणेरडे वाटतात!
काही लोक जे थोडेफार जास्त वाचलेले आणि सुसंस्कृत वाटत होते ते आता सर्वात घाणेरडे वाटतात. त्यांच्या विधानांतून त्यांची मानसिकता प्रतिबिंबित होते, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांना अनुल्लेखाने टोला लगावला.
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये गोऱ्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांनी शिवसेनेला सोडले आणि गोरक्षकांसारखे स्वत:चे रक्षण करण्यासाठी पळून गेले त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांची घाणेरडी राजकारणी बाजू उघड केली, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे. सत्तेचा स्वत:च्या फायद्यासाठी असा दुरुपयोग यापूर्वी देश आणि समाजाने कधीच पाहिला नव्हता, असेही त्यांनी म्हटले आहे.
तुमचं राजकारण बाहेर ठेवा! आयोजकांकडून गोऱ्हे यांचा निषेध
राजकारण्यांनीही भान ठेवावे. संमेलनाचे व्यासपीठ हे राजकीय वक्तव्य करण्यासाठी नाही, असे स्पष्ट मत संमेलनाचे आयोजक संजय नहार यांनी व्यक्त केले आणि नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तुमचे जे काही मतभेद असतील, मतभिन्नता असेल तर ती बाहेर ठेवा. वैयक्तिक आरोप करण्याचे हे स्थान नाही, असे नहार म्हणाले. खरंतर संमेलनाच्या व्यासपीठावरील वक्तव्याविषयी महामंडळाने एक आचारसंहिता तयार करायला हवी, असे संजय नहार म्हणाले.
साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी, शिवसेनेची मागणी
टिनपाट निमंत्रकांनी संमेलनाचा राजकीय वापर केला. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. संमेलनाचे व्यासपीठ अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले आहे का, साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे का? नसेल तर महामंडळाने त्वरित माफी मागावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी महामंडळ अध्यक्षा उषा तांबे यांच्याकडे केली.
मी अशा गयेगुजऱ्या लोकांकडे लक्ष देत नाही
नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांकडे माध्यमांनी लक्ष वेधले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘दाखवा ना मला मर्सिडीज कुठे आहेत? हे गयेगुजरे लोक आहेत. त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. महिला म्हणून त्यांच्याविषयी मला आदर आहे. राजकारणात त्यांनी त्यांचे चांगभलं केलं आहे.’ मर्सिडीजमधून फिरणाऱ्या लोकांना विचारा लाडक्या बहिणींना पैसे का नाही मिळाले? स्वतः मर्सिडीजमधून फिरत आहेत, मग लाडक्या बहिणी का उपाशी राहिल्या? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.