सोलापूरकरांना अळय़ायुक्त पाण्याचा पुरवठा; आरोग्य धोक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर शहराला अळ्यायुक्त घाण पाण्याचा पुरवठा होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महापालिकेत सत्यनारायण पूजा घालूनही कार्यवाही होत नसल्याने अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महापालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्या घाण पाण्याच्या बाटलीबरोबर पुष्पगुच्छ देऊन उपरोधिक सत्कार करण्यात आला. दरम्यान, आठ दिवसांत सोलापूरकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, सहा ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातच चौपाड, राघवेंद्र मठ व इतर परिसरात अळ्यायुक्त आणि घाण पाणीपुरवठा होत आहे. यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी दुपारी महापालिकेत पाणीपुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे यांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले. अधिकारी चौबे यांना घाण पाण्याच्या बाटलीबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उपरोधिक सत्कार करण्यात आला.

आंदोलन करूनही प्रशासन कार्यकाही करत नाही. अधिकारी कार्यालयातच बसून असतात. मग प्रश्न कसा सुटणार, असा सवाल केला. आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास ‘शिवसेना स्टाइल’ने आंदोलन करण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिला आहे. यावेळी शहर उत्तर समन्वयक महेश धाराशिवकर, संजय गवळी, बंटी बेळमकर, उज्ज्वल दीक्षित, सतीश माने, प्रकाश ननवरे, विशाल सोरेगावकर, विजय जव्हेरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, चार दिवसांत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी दिले.