
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवासेना प्रमुख, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या अधिकृत प्रवक्त्यांची यादी आज जाहीर करण्यात आली. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य प्रवक्त्यांबरोबरच अन्य प्रवक्त्यांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात खासदार प्रियंका चतुर्वेदी, परिवहनमंत्री अनिल परब, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, अंबादास दानवे, मनीषा कायंदे, महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंद दुबे यांचा समावेश असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

























































