
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राज्यभरातील सर्व तहसील कार्यालयांवर शिवसेनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झोडपले असून हेक्टरी 25 हजार, तर बागायतदारांना 50 हजारांची नुकसानभरपाई द्यावी अशी शिवसेनेची मागणी आहे.
राज्यपालांनी मात्र हेक्टरी 8 हजारांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये प्रचंड नाराजी असून राज्यपालांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. राज्यभरात एकाच दिवशी एकाच वेळी 275 ठिकाणी हे मोर्चे निघणार आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.
संभाजीननगरमध्ये सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले चौकातून धडक मोर्चाला सुरुवात होणार असून शिवसेना नेते आणि जिह्यातील आमदारांच्या उपस्थितीत हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. याशिवाय वैजापूर, गंगापूर, कन्नड ,सोयगाव, सिल्लोड, खुलताबाद, फुलंब्री तहसील कार्यालयांवरदेखील एकाच वेळी शिवसेनेचे मोर्चे तहसील कार्यालयांवर धडकणार आहेत.



























































