
मुंबईत कोरोना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, पोलीस, शिक्षक तसेच अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक कोरोना योद्धय़ाने लढा दिला. कोरोनाच्या या काळात गोपाळकाला साजरा न करता राज्य सरकारला सहकार्य करणारी गोविंदा आणि दहिहंडी उत्सव मंडळेही खरे कोरोना योद्धे आहेत, अशी कृतज्ञता शिवसेनेने व्यक्त केली असून सर्वांचे आभार मानले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहिहंडी उत्सव साजरा करू नका, आरोग्याला जपा, असे आवाहन मुंबईतील गोविंदा आणि दहिहंडी उत्सव मंडळांना केले होते. त्या पार्श्वभूमीवर, दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील सर्व गोविंदा व दहीहंडी उत्सव मंडळांनी उत्सव साजरा केला नाही. उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेऊन कोरोनावर मात करण्याच्या प्रयत्नांना मंडळांनी सहकार्य केले. त्यामुळे तुम्हीच खरे कोरोना योद्धे आहात. पुढच्या वर्षीचा दहिहंडी उत्सव आपण सगळे मिळून दिमाखात साजरा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद, अशा शब्दांत शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी सर्व मंडळांचे आभार मानले आहेत. यावेळी उपमहापौर सुहास वाडकरसुद्धा उपस्थित होते.




























































