रत्नागिरीला स्मार्ट,आरोग्यदायी आणि सक्षम बनवणार! नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी सावंत-माने यांनी जाहीर केला वचननामा

रत्नागिरीत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज 25 नोव्हेंबर रोजी आपला वचननामा पत्रकार परिषदेत जाहीर केला.रत्नागिरीत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारून आरोग्य विषयक सुविधा निर्माण करणार,स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे विद्यार्थी सहाय्यता योजना राबवणार, नगरपरिषद मालकीच्या इमारतीत सौर ऊर्जेचा वापर करणार,नगरपरिषदेची स्मार्ट शाळा उभारणार,विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना,माहितीच्या अधिकारासाठी ऑनलाइन प्रणाली,नागरिकांच्या तक्रारींचे 72 तासात निवारण करणार,युवकांसाठी रोजगार अशा विविध संकल्पना महाविकास आघाडीच्या रत्नागिरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत-माने यांनी आज पत्रकार परिषदेत जाहिर केल्या.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत-माने यांनी सांगितले की, रत्नागिरी शहरात स्मार्ट सिटी मिनी प्रोजेक्ट राबवणार आहोत.त्यामध्ये डिजिटल सुविधा,ई-पार्किंग,पथदीप,वायफाय क्षेत्र,डिजिटल माहिती फलक,सिग्नल यंत्रणा,कचरा व्यवस्थापन,वाहतूक पोलिसांसाठी निवारा,गोशाळा,पदपथ,स्मशानभूमी, दफनभूमी येथे पायाभूत सुविधांची निर्मिती करणार.घरगुती सौरऊर्जा निर्मितीसाठी अनुदान देणार,सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही,नगरपरिषदेच्या रूग्णालयात सर्व प्राथमिक चाचण्या मोफत करणार,आरोग्य शिबिरांचे आयोजन करणार. तसेच 100 दिवसात 1 हजार युवकांना नोकरी मिळवून देण्याचे लक्ष्य, 50 होतकरू युवकांना उद्योजक होण्यासाठी आर्थिक आणि कायदेशीर सहाय्य करणार,अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार,नोकरीसाठी पोर्टल सुरू करणार असल्याचे शिवानी सावंत-माने यांनी सांगितले. यावेळी उपनेते बाळ माने,शहरप्रमुख प्रशांत साळुंखे,मिहिर माने,विराज माने,साजिद पावसकर अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
 
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे विद्यार्थी सहाय्यता योजना 
आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे विद्यार्थी सहाय्यता योजना राबवणार आहोत.पिवळे रेशनकार्ड धारक असलेल्या 10 वी आणि 12 वी मधील विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रूपयांचे शैक्षणिक सहाय्य देणार आहोत.तसेच शहरातील महिला बचत गटांसाठी बिनव्याजी १ लाख रुपयांचे कार्य भांडवल सहाय्य देऊन आम्ही त्यांना सहकार्य करणार आहोत. महिलांच्या रोजगारासाठी 50 हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही देणार आहोत.पर्यटन विकासासाठी आवश्यक
त्या उपाययोजना आणि नवीन वॉटर स्पोर्ट्स, सिकुड़ा ड्रायव्हिंग सारखे उपक्रम सुरू करणार असे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत- माने यांनी सांगितले.