ते चोर आहेत, त्यांनी चोऱ्या केल्या आहेत, आता तेच चोरीचे पुरावे मागत आहेत; संजय राऊत यांचा मिंधे, भाजपवर घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग, भाजप आणि मिंध्यांवर चांगलाच हल्ला चढवला. आम्ही निवडणूक आयोगाला सवाल करत आहोत, तर भाजप आणि मिंधे का उत्तर देत आहे? असा सवाल त्यांनी केला. ते चोर आहेत, त्यांनी चोऱ्या केल्या आहेत, आता तेच चोरीचे पुरावे मागत आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला.

4 दिवसात साडेसहा लाख मतदार वाढवले गेले. हा काय प्रकार आहे? कोठून येतात हे मतदार? अमित शहा दोन दिवसांपूर्वी म्हणाले की, घुसखोर असतील त्यांना शोधून काढू आणि मतदार यादीतून हाकलून देऊ. महाराष्ट्रात 1 कोटी बोगस मतदार घुसखोर आहेत, असे आम्ही मानतो. हे घुसखोर मतदार भाजप, मिंधे यांनी घुसवले आहेत. अमित शहा यांनी या यादीपासून सुरुवात करावी. जोपर्यंत मतदार यादीत घोटाळा आहे, तोपर्यंत निवडणुका निःपक्ष पारदर्शक होणार नाहीत. याकडे देशाचे लक्ष वेधण्यासाठी 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. काल याबाबतची घोषणा झाली आहे. याबाबत शिवसेना भवनात काल झालेल्या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले.

मतदारयादीत बोगस नावे असल्याचे पुरावे द्या, निवडणूक आयोग कार्यवाही करेल, असे युतीचे नेते म्हणत आहेत. मात्र, निवडणूक आयोग कार्यवाही करेल, हे ते कशाच्या भरवशावर म्हणत आहेत. निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी, यासाठी दोन दिवस सर्वपक्षीय शिष्टमंडळ त्यांना भेटले, त्यांनी काय कार्यवाही केली? असा सवालही संजय राऊत यांनी केला. लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान सुमारे 50 लाखांनी वाढलेले मतदान आणि जे वाढलेले मतदान आहे, ते एकाच पक्षाकडे कसे काय गेले? चोरी केल्याचा चोर पुरावा मागत आहे. ज्या चोरांना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत रंगेहात पकडले आहे, तेच आता पुरावे मागत आहेत. ते चोर आहेत, त्यांनी चोऱ्या केल्या आहेत आणि आमचा प्रश्न निवडणुक आयोगाला आहे. याचे ते उत्तर देतील, यात भाजपला उत्तर देण्याचे काहीही कारण नाही. संवैधानिक पदावर असलेल्या संस्थेला आमचा प्रश्न आहे, त्यात भाजप किंवा मिंध्यांना मिरच्या लागण्याचे किंवा त्यांनी उत्तर देण्याचे काहीही कारण नाही. ते याला उत्तर देतात याचाच अर्थ खाई त्याला खवखवे किंवा चोराच्या मनात चांदणे असे आहे. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहोत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मुख्य निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारत होते. मात्र, त्यावर भाजपचे नेते उत्तर देत होते, असे त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तरे आयोगाने दिली पाहिजेत. तसेच आमच्या शंकांचे निरसनही त्यांनीच केले पाहिजे. मात्र, जर भाजप किंवा मिंधे यावर उत्तर देत असतील तर ही सर्व त्यांचीच मिलीभगत आहे, हे दिसून येते. निवडणूक आयोग, भाजप आणि मिंधे यांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्याचे हे जॉइंट व्हेंन्चर आहे, असा घणाघातही त्यांनी केला.