राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागणे म्हणजे निवडणूक आयोगाची मग्रुरी; संजय राऊत संतापले

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर निवडणूक आय़ोगाने दिलेले नाही. मात्र, राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहे. निवडणूक आयोगाची ही भूमिका म्हणजे मग्रुरी आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपासारखेच आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहेत. त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्र मागण्याची हिंमत निवडणूक आयोगाकडे आहे काय? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

सध्या देशात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राहुल गांधी यांनी मतचोरीविरोधात जी यात्रा काढली आहे. तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. निवडणूक आयोगाच्या अनागोंदीबाबत पुकारलेला एल्गार महत्त्वाचा विषय आहे. या महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष हटू नये, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे.

निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र मागितले आहे, अन्यथा माफी मागा, असे म्हटले आहे. ही भूमिका म्हणजे मग्रुरी आहे. अशी मग्रुरी निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी, संवैधानिकपदी बसलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. अशी मग्रुरी भाजपच्या हस्तकांकडून अपेक्षित आहे. त्याप्रमाणे निवडणूक आयुक्त वागलेले आहेत. प्रतिज्ञापत्र राहुल गांधी यांच्याकडून मागण्यात येते. असे असेल तर देशातील 80 कोटी जनता प्रतिज्ञापत्र द्यायला तयार आहे.

अनुराग ठाकूर यांनीही तोच आरोप केला आहे. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार ज्या पक्षाची वकील करत आहे, त्याच पक्षातील अनुराग ठाकूर यांच्यासह अनेकांनी राहुल गांधी यांच्याप्रमाणेच आरोप केले आहेत. कोणत्या मतदारसंघात डुप्लिकेट मतं पडली, कुठे मतचोरी झाली, असे आरोप केलेले आहेत. हाच आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला असेल तर निवडणूक आयोगाची केंद्रीय मंत्र्यांकडे प्रतिज्ञापत्र मागण्याची हिंमत आहे का? असा सवालही त्यांनी केला. मतचोरी झाली, असे केंद्रीय मंत्री म्हणत असतील तर निवडणूक आयोगाने आधी त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्र मागावे. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या एकही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. अनेक योजना बंद होत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील प्रमुख मंत्री लंडमनला गेले आहेत. राज्य वाऱ्यांवर सोडून अनेक प्रमुख मंत्र्यांनी लंडनवारी करावी, हे आश्चर्य आहे. महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून ,अनेक प्रश्न असताना अनेक मंत्री लंडनमध्ये आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. तसेच राज्यात अनेक समस्या असतानाही मंत्री परदेशवारी करत आहेत, हे खेदजनक असल्याचे त्यांनी सांगितले.