
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत इंडिया आघाडीत सहमतीने आणि एकमताने निर्णय घेण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आमची आणि इंडिया आघाडीची भूमिका एकच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे. राज्यात गेले वर्षभर ते शांतपणे काम करत आहेत. राजकारणातील सरळमार्गी व्यक्ती ते आहेत. त्यांनी तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, भाजप रुजवण्याचा प्रयत्न केला. भाजपमध्ये दक्षिणेकडील राज्यात त्यांनी अनेक पदे भूषवली आहे. ते कोईम्बतूरमधून लोकसभेतही होते. महाराष्ट्रातील राज्यपालांना उपराष्ट्रपती संधी मिळत असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे.
याआधीही डॉ. शंकरदयाळ शर्मा राज्याचे राज्यपाल होते. ते उपराष्ट्रपती आणि नंतर राष्ट्रपती झाले. महाराष्ट्राशी संबंधित व्यक्ती संवैधानिक पदावर जातात, तेव्हा मोकळ्या मनाने आम्ही त्यांचे स्वागत आणि अभिनंदनही करतो. मात्र, ते एनडीएचे उमेदवार आहे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) इंडिया आघाडीचा घटक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात दिल्लीत असताना लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्याशी त्यांची चर्चा झाली. त्यावेळी उपराष्ट्रपतीपदाबाबतही निश्चितपणे चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका आणि मत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याकडे मांडले आहे. काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. यामध्ये शिवसेनेची वेगळी भूमिका असण्याचा प्रश्न नाही. इंडिया आघाडी म्हणून आमचा निर्णय सहमतीने घेण्यात येईल.
भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सर्व पक्षांना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले आहे. संवैधानिक पदावरील निवडणुका राजकीय संघर्षातून होऊ नये, असे आमचे मत आहे. जर सर्व पक्षांमध्ये सहमती होत अेल आणि इंडिया आघाडीलाही हे मान्य असेल तर आम्हीसुद्धा त्या निर्णयासोबतच राहणार आहोत. त्याता दुमत असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.