दोन मंत्री भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीच्या आरोपामुळे पदावरून गेले, हा या सरकारला लागलेला काळीमा; संजय राऊत यांचा घणाघात

भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण अजूनही सुरू आहे. अमित शहा पक्ष आणि माणसे फोडण्यात पटाईत आहेत. भाजप भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीच्या आरोपामुळे पदावरून गेले, हा सरकारसाठी काळीमा असल्याचा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

सत्तेचा वापर करून पक्ष, माणसे फोडण्यात अमित शहा पटाईत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे त्यांच्या पक्षश्रेष्ठींना न सांगता दिलिलीत शहा यांची भेच घेण्यासाठी गेले, यात काही आश्चर्य नाही. मुंडे हे मंत्री होतील की नाही, त्यांना मंत्रीपद मिळेल की नाही, याबाबत आपण आता सांगू शकत नाही. मात्र, मुंडे यांना पुन्हा मंत्रीपदी बसवणे फडणवीस यांना सोपे नाही.

बीडमध्ये ज्याप्रकारे संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यात धनंजय मुंडे यांचे समर्थन असलेल्या गुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या. त्यामुळे त्यांचे पद गेले होते. आता ते कारण संपले का? अजूनही वाल्मीक कराड जेलमध्ये आहे. अजूनही खटला सुरू आहे. अशा वेळेला ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आणि गुन्हे होते, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे पाप फडणवीस करतील, असे वाटत नाही. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपामुळे पदावरून गेले, हा या सरकारला लागलेला काळीमा आहे. शिंदे गटातील अनेक मंत्री असे आहेत की, ज्यांना तात्काळ बडतर्फ केले पाहिजे. काहीदण पैशांच्या बॅगा दाखवत आहेत, काहीजण पैसे मोजत आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र, फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करत आहेत आणि शेवटचा घाव ते मिंध्यांवर घालतील, याची पूर्ण खात्री आहे, असे संजय राऊत म्हणाले.

कोकाटे ही हिट विकेट आहे. त्यांचे सदनिका प्रकरण, बनावट कागदपत्रे हे जुने प्रकरण आहे. फक्त योग्यवेळी ते बाहेर आले आहे. ते कसब फडणवीसांकडे आहे. भ्रष्ट आमदार, खासदार आणि नेत्यांनी आमच्या पक्षात यावे, आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या पाठिशी उभे राहतो, हा संदेश देण्यासाठी सरकार कोकाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तसे नसते तर काल अमित शहा मुंडे यांना भेटले नसते, हाच संदेश दिल्लीत शहा आणि महाराष्ट्रात फडणवीस देत आहेत.

भाजप हा मिंधेचा गट गिळणार आहे. पुढील विधानसभा निवडणुकांपर्यंत मिंधेचा गट अस्तित्वात असेल की नाही, ही शंका आपल्याला आहे. तसेच अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत. त्यामुळे त्यांच्याशी हातमिळवणी करणे म्हणजे भाजपचे हात बळकट करण्यासारखे आहे. काहीही झाले तरी अजित पवार भाजपच्याच पाठिशी उभे राहणार आहेत. ते तात्विक विचाराने भाजपकडे गेलेले नाही, त्यांची ती मजबुरी आहे. स्वतःची आणि कुटुंबाची कातडी वाचवण्यासाठी ते भाजपमध्ये गेलेले आहेत.