ड्रग्जचे कारखाने हीच महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि उद्योग आहे का? संजय राऊत यांचा संतप्त सवाल

राज्यात ड्रग्जचे रॅकेट पसरत आहे, ही गंभीर बाब आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात यावी आणि साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांवर तातडीने करावाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच या वाढत्या ड्रग्ज रॅकेटबाबत त्यांनी चिता व्यक्त केली.

तरुणाई ड्रग्जसच्या विळख्यात अडकली आहे. शाळा, कॉलेजमध्येही त्याचे व्यसन पसरत आहे. आधी ड्रग्ज बाहेरून येत होते, आता महाराष्ट्रात त्याचे कारखाने सुरू होत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस सांगतात, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग आणि गुंतवणूक येणार आहे. ड्रग्जचे कारखाने हीच गुंतवणूक आणि हेच उद्योग आहेत का, असा सवालही त्यांनी केला.

या प्रकरणात साताऱ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या भावाचे नाव आले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने तेथील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. त्यांनी कोणाला आणि कसे या रॅकेटमधून वाचवण्याचा प्रयत्न केला, ते शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यामधील ड्रग्ज रॅकेट सत्ताधाऱ्यांच्या घरापर्यंत पोहचले असेल आणि तेथून ही सर्व यंत्रणा राबवली जात असेल तर या महाराष्ट्रात काय राहिले? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

राज्यात अनेक ठिकाणी बेगुमानपणे झाडांची कत्तल होत आहे. हत्या होत आहेत, भ्रष्टाचार बोकाळला आहे, मंत्रीच वॉन्टेड आहेत, मंत्री परागंदा होतात, मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. आता त्यात ड्रग्जच्या रॅकेटची भर पडली आहे. ही स्थिती महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर आहे.