जातीजातीत भांडणे लावत महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईत धडकलेल्या मराठा आंदोलक आणि या आंदोलनाबाबत मत व्यक्त केले. मुंबईत लाखोंच्या संख्येने आलेल्या मराठी बांधवांचे त्यांनी स्वागत केले. तसेच यातून मराठीची ताकद मुंबईच्या शत्रूंना समजू द्या, असे ते म्हणाले. ही परिस्थिती हाताळण्यात गृहखाते, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस अपयशी ठरले आहे. त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली असती तर हे वादळ मुंबईत आलेच नसते, असे परखड मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले.

मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची राजधानी आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातला माणूस आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईत आला आहे. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे न्यायालयाचे काम नाही. कोणी न्यायव्यवस्थेचा हवाला देत असेल तर ते अयोग्य आहे. कायदा सुव्यवस्था राखणे ह सरकारचे, गृहखात्याचे आणि मुख्यमंत्र्यांचे काम आहे. मुख्यमंत्री अप्रत्यक्षपणे सांगत आहेत की, कोणीतरी मनोज जरांगे यांच्या खाद्यांवर बंदूक ठेवत राजकारण करत आहे. एक समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी राज्याच्या राजधानीत आला असेल, तर त्यात त्यांना राजकारण काय दिसते? असा सवालही त्यांनी केला.

ते जेव्हा जेव्हा सत्तेत आले आहेत, तेव्हा त्यांनी या प्रश्नाला चालना दिली आहे. त्या माध्यमातून फडणवीस यांनी राजकारण केले आहे. जरांगे यांच्या खाद्यांवर बंदूक ठेवत कोणी राजकारण करत आहे, असे त्यांना वाटते, तर ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जनतेला विश्वासात घेत असे राजकारण कोण करत आहे, ते सांगावे. असे राजकारण करणारे त्यांच्या पक्षात आहेत, मंत्रिमंडळात आहेत की विरोधी पक्षात आहेत, ते त्यांनी स्पष्ट करावे,असेही संजय राऊत म्हणाले.

लाखोंच्या संख्यने आंदोलक आझाद मैदानात आले आहेत. मुंबईत गणेशोत्सव सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.हे सर्व वांधव गणेशोत्सवाला कोणत्याही प्रकारे अडथळा न आणता त्यांचे आंदोलन करतील, असा आपल्याला विश्वास आहे. सरकारने यात दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर भडका उडेल कारण मनोज जरांगे दबावात येणारे आहेत, असे वाटत नाही. तसेच त्यांनी सरकारला आमरण उपोषणाचा इशारा देत आरक्षण मिळवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार केला पाहिजे. सरकारने संयमाने चर्चा करत यातून मार्ग काढला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या संख्यने मराठी माणूस येत आहे, त्यांचे स्वागतही आम्ही करतो. मुंबईत मराठी माणसाचा आवाज क्षीण होत आहे. मुंबई गिळण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वेळी एवढ्या मोठ्या संख्यने मराठी माणसे मुंबईत येत आहेत, तर मुंबईच्या शत्रूंना मराठी माणसाची ताकद काय आहे, ते एकदा समजू द्या. हा मुद्दा सोडवण्यासाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही. सरकारकडे योजना असती, तर त्यांनी आंदोलकांवर मुंबईत येण्याची वेळ आणली नसती. सरकारने मराठवड्यात जात जरांगे यांच्याशी मुख्मंत्र्यांनी चर्चा केली असती तर हे वादळ मुंबईत आले नसते, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.

ब्राह्मण समजासाठी परशुराम महामंडळ स्थापन करत निधी उपलब्ध केले आणि पाच सनदी अधिकारी त्या कामासाठी नेमले. मात्र, मराठा समाज मात्र रस्त्यावर आहे. ही दरी समजून घेतली पाहिजे. यामुळेच जनता चिडली आहे. फडणवीस यांच्यावर होत असलेल्या आरोपांना तेच जबाबदार आहेत. हा महाराष्ट्र, यातील जाती उपजाती माझ्या आहेत, मी या सगळ्यांचा नेता आहे. या विचाराच्या दिशेपासून ते भरकटले आहेत. ते एकजातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे इतर जातीत वाद निर्माण करणे ,भांडणे लावण्याचे काम ते करत आहेत. राजकीयदृष्ट्या देशात जे मोदी करत आहेत, तेच राज्यात फडणवीस करत आहे. अशा प्रकारे ते महाराष्ट्राल आग लावण्याचे काम करत आहेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेण्याची गरज आहे. याआधी अनेक मुख्यमंत्र्यांनी आंदोलक किंवा उपोषण कर्त्यांची भेट घेत हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. ही वेळ कोणत्याही पक्षाची भूमिका व्यक्त करण्याची नाही. ही वेळ आर्थिक मागास आणि एका समाजाला त्यांच्या न्याय्य हक्क मिळवून देण्याची आहे. यातून जर काही पेचप्रसंग ओढवला तर त्याला राज्याचे गृहखाते आणि गृहमंत्रीच जबाबदार असतील. पक्ष फोडणे, आमदार विकत घेणे, विरोधकांवर गुन्हे दाखल करणे, हेच गृहखात्याच्या माध्यमातून काम करण्यात फडणवीस तरबेज आहेत. मात्र, अशाप्रकारचे पेचप्रसंग सोडवण्याची क्षमता फडणवीस यांची नाही, असा आरोपही त्यांनी केला.