भ्रष्ट मंत्र्यांचा मलीदा, थैल्या दिल्लीत पोहचत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्यांना अभय आहे; संजय राऊत यांचा आरोप

राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांकडून दिल्लीत मलीदा आणी थैल्या पोहचत आहेत, त्यामुळेच महाराष्ट्रातील भ्रष्ट मंत्र्यांना अभय आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार सजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. तसेच राज्यात अनेक मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांचा राजीनामा घेण्याची गरज आहे, असे परखड मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले.

गुजरातमधील मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला असून आज नवे मंत्री शपथ घेणार आहेत, त्याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, ही गरज महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्री फडणवीस वगळता इतर सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेत, मंत्रिमंडळ रिशफल करणे गरजेचे आहे. कारण मंत्रीमंडळात अर्ध्यापेक्षा जास्त मंत्री भ्रष्ट आणि कामचुकार आहेत. मात्र, फडणवीस यांना दिल्लीतून असे आदेश दिले जात नाहीत, कारण या भ्रष्ट मंत्र्यांचा मलिदा आणि थैल्या दिल्लीत पोहचवल्या जात आहेत. त्यामुळे या भ्रष्ट मंत्र्यांना महाराष्ट्रात अभय आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

महाराष्ट्र आणि पंजाब ही कृषीप्रधान राज्य म्हणून ओळखली जात होती. शेतीमधील हरितक्रांतीची सुरुवात महाराष्ट्रापासून सुरू झाली. मात्र, आज दुर्दैवाने महाराष्ट्रात शेतीचे ज्ञान असलेला कृषिमंत्री नाही, शेतीतले ज्ञान असणारा अधिकारी नाही. शेतीत काही नवे संशोधन नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांप्रती भावना आणि संवेदना नाहीत. त्यामुळे फक्त ते बांधावर जाऊन घोषणा करत आहेत आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही, हे राज्यातील कटू सत्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बिहारच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून फडणवीस जाणार आहत. मात्र, ते स्टार नसून सुपरस्टार आहेत. त्यांना स्टार म्हणून त्यांचा अपमान करू नका, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्राच माणूस बिहारमध्ये जात आहेत. त्यांचे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येतात, इतर नेते महराष्ट्रात येतात. त्यामुळे आता भाजपमध्ये जन्मतः स्टार निर्माण होत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यातच नाही तर देशात कोणाचेही बोगस आधारकार्ड तयार केले जाऊ शकते, अशी यत्रंणा आहे. नोटबंदीच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावा केला होता की, आता बोगस नोटा छापल्या जाणार नाहीत. त्यासाठी त्यांनी 2000 रुपयांच्या नोटा बंद केल्या. मात्र, नोटबंदी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बोगस नोटा चलनात आल्या. त्याबाबत नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी काय केले? त्यांनी काहीही केले नाही, त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात आपल्या चलनात बोगस नोटा आहेत. त्यामुळे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र बोगस छापले जाते, त्यात काही नवीन नाही. त्यामुळे फक्त डोनाल्ड ट्रम्पच काय, कोणाच्याही नावाने बोगस कार्ड छापले जात असतील.