मराठा समाजासोबतच इतरही समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांबाबत एकमताने निर्णय घ्या! – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav thackeray

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठा समाजासोबत अन्य समाजांच्याही न्याय्य हक्काच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वाजपेयी सरकारच्या काळात धनगरांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मराठा असो धनगर असो किंवा महाराष्ट्रातील वंजारी, महादेव कोळी, गोवारी, जंगम शिवाय मुस्लिम समाजाच्या काही रास्त मागण्या असतील तर या सर्वच मागण्या एकत्र करून एकदाच काय ती शिफारस एकमताने मंजूर करून संसदेकडे मान्यतेसाठी पाठवणं गरजेचं आहे, जेणेकरून माझा मराठी माणूस आनंदाने नांदेल, अशी खणखणीत आणि स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट पाहत बसू नका. काहीही करा, कोणतेही निकष लावा, पण मराठा आरक्षण द्या, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना खांद्याला खांदा लावून लढेल असे ठामपणे सांगतानाच इतर समाजांच्या मागण्यांवरही सर्वंकष विचार होऊन निर्णय घ्यायला हवा जेणेकरून मराठी माणूस एकजुटीने, आनंदाने नांदेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलवली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा समाजाने शांततेने मोर्चे काढले तेव्हाच हा विषय सोडवायला हवा होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी शिवसेनेची मागणी त्यावेळी गांभीर्याने घेतली गेली नाही. मराठा शांततेने मागतो त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि रस्त्यावर उतरतो त्यावेळी लक्ष दिले जाते हे लोकशाहीचे दुर्दैव आहे, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

हा विषय न्यायालयाचा आहे का?

मराठा आरक्षणाचा चेंडू न्यायालयाकडे टाकण्यात आला आहे. पण खरंच हा विषय कोर्टाच्या अखत्यारीतील आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. राज्यकर्त्यांची एक प्रवृत्ती असते. एखादा विषय अडचणीचा असला की समिती नेमली जाते, नाहीतर तो विषय कोर्टाकडे ढकलला जातो, अशा शब्दांत सरकारच्या चालढकलीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

शिवसेना सोबत राहील!

संसदेत भाजपचं सरकार आहे. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. विविध समाजांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच शिवसेना त्यांच्यासोबत राहील. अन्य राज्यांनीही याविषयीचे प्रश्न पाठवावेत. संसदेने त्यांना त्वरित मान्यता द्यावी. त्यासाठी शिवसेना आग्रही भूमिका घेईल. हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी शिवसेना हवं ते सर्व सहकार्य महाराष्ट्राच्या विधिमंडळात करेल. त्याचप्रमाणे देशाच्या संसदेतही सहकार्य करेल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

महाराष्ट्रात आगी लागू द्यायच्या नाहीत

मराठा आरक्षणाविषयी अन्य पक्षांतील नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी सडेतोड मत मांडले. ते म्हणाले, मला महाराष्ट्रात आगी लागू द्यायच्या नाहीत. राजकारण करायचं असेल तर प्रत्येक नेत्याच्या भूमिकेबद्दल मी बोलू शकतो, पण मला ते बोलायचं नाही. मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे. मराठी माणसांत मला भांडण नकोय. माझा महाराष्ट्र एकजूट राहायला हवा. मराठी माणसांमध्ये पुन्हा एकदा जातीपातीच्या भिंती उभ्या राहून दुरावा निर्माण होता कामा नये या मताचा मी आहे.

वाट्टेल ते निकष लावा, पण गोरगरीबांची पोटं भरायला हवीत

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका ही त्यांची भूमिका होती. शिवसेनेचीही तीच भूमिका आहे. पण आर्थिक निकष तुम्हाला मान्य नसतील तर निकष काहीही लावा. माझ्या गोरगरीब बांधवांचे, जे न्याय्य हक्कांपासून वंचित आहेत त्यांची पोटं पहिली भरायला हवीत. त्यांचं शिक्षण असेल, नोकरी असेल त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी वाटेल ते निकष लावा पण त्यांना आनंदी ठेवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अन्य समाजांना जे दिलं गेलं ते कमी करू नका!

मराठा समाजाला आरक्षण देताना वंचित राहिलेल्या समाजाच्या मागण्यांचाही एकत्रित विचार करा; पण हे करताना आतापर्यंत ज्यांना दिलं गेलेलं आहे त्यांचं काही कमी न करता दिलं जावं ही शिवसेनेची भूमिका आहे. मराठा समाजाचीही हीच मागणी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

विघातक पाऊल उचलू नका!

मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, पण आत्महत्या हा त्यावरचा उपाय नाही. मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो, कृपा करून आक्रमकतेने विघातक पाऊल उचलू नका. शिवसेना तुमच्यासोबत आहे. न्याय्य हक्कांसाठी शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून लढेल. तुमच्या बरोबरीने इतरही माता-बांधव आहेत त्यांचाही विचार करूया. आपला शिवरायांचा महाराष्ट्र एकजूट ठेवू, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

राजीनामा देण्यापेक्षा सभागृहात मत मांडा

आमदारांकडून देण्यात येत असलेल्या राजीनाम्याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. अशावेळी राजीनामा देणं योग्य की सभागृहात या विषयावर आपलं मत मांडणं योग्य, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. सर्वांनी जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.