ग्राम पंचायतीत शिवसेनेचे सरपंच विराजमान; कर्जतमध्ये 8, भिवंडीत 10 तर पालघरच्या सागावेवर प्रथमच भगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

ग्रामपंचायत निवडणुकीत ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांत जोरदार मुसंडी मारलेल्या शिवसेनेने सरपंचपदाच्या निवडणुकीतही बाजी मारली आहे. बहुतांश ग्रामपंचायतीत शिवसेनेचे सरपंच विराजमान झाले आहेत. कर्जत तालुक्यातील 10 पैकी 8 तर भिवंडीतील 10 ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला आहे. पालघरमधील महत्त्वाचे समजले जाणाऱ्या सागावेत प्रथमच शिवसेनेची सत्ता आली आहे.

कर्जतमध्ये आठ पंचायतीत दणदणीत विजय

कर्जत तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत विरोधकांना अस्मान दाखवत आठ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. यामध्ये पाच ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे थेट सरपंच बहुमताच्या जोरावर निवडून आले असून उर्वरित तीन ग्रामपंचायतीवर शिवसेना शेकाप युतीचे सरपंच विराजमान झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जत तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

15 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत यश मिळवले होते. त्यानंतर आज झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीतही दहापैकी आठ ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आली आहे.

यामध्ये कोल्हारे – सरपंचपदी महेश विरले, उपसरपंच अस्मिता विरल, भिवपुरीसरपंच संगीता माळी, उपसरपंच हरिश्चंद्र मिसाळ; हुमगाव – सरपंच सुनील बागडे, कडाव – सरपंच अशोक पवार, उपसरपंच हर्षद भोपतराव; जिते – सरपंच रेणुका मिरकुटे, उपसरपंच तुकाराम भोईर; पोशीर -सरपंच आरती राणे, उपसरपंच सतीश राणे; साळोख – सरपंच मनीषा शिनारे, उपसरपंच मोहन विरले; वैजनाथ – सरपंच स्नेहल दरेकर, उपसरपंच यमुना कातकरी तर मनीवली सरपंचपदी तुषार गवळी विराजमान झाल्याची माहिती आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली.

मानतर्फे झिराड ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच शिवसेनेची सत्ता, शेकापची राजवट उलथवली

अलिबाग तालुक्यातील मानतर्फे झिराड ग्रामपंचायतीत शेकापची वर्षानुवर्षांची सत्ता शिवसेनेने उलथवून टाकली. या ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला. आज झालेल्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अस्मिता म्हात्रे तर उपसरपंचपदी अपक्ष सदस्य राकेश पाटील हे निवडून आले आहेत.

मानतर्फे झिराड ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंक परिस्थिती निर्माण झाली होती. शिवसेनेचे पाच तर शेकाप आणि काँग्रेस आघाडीचे पाच आणि एक अपक्ष सदस्य असे अकरा सदस्य निवडून आले होते. आमदार महेंद्र दळवी यांनी अपक्ष राकेश पाटील यांच्या मदतीने सत्ता मिळविली. राजिप गटनेत्या मानसी दळवी, काँग्रेस उपाध्यक्ष अनंत गोंधळी, शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालघर : तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या ममता गायकवाड तर उपसरपंचपदी संदेश खटाळी यांची निवड झाली आहे. पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा महिला संघटक वैष्णवी रहाणे, पंचायत समिती सभापती रंजना म्हसकर-घोलप, जिल्हा सचिव दिनेश पाटील, उपतालुकाप्रमुख अनंता पुंजारी, बोईसर विधानसभा सहसमन्वयक राजेंद्र पाटील, रवींद्र खटाळी, पंढरी पाटील उपस्थित होते.

नागोठणे: ऐनघर ग्रामपंचायत सरपंचपदी कलावती कोकळे, उपसरपंच – मनोहर सुटे तर वरवठणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ऋतुजा म्हात्रे, उपसरपंच – विजय पाटील,खरापटीच्या सरपंचपदी स्वामिनी डोलकर तर उपसरपंचपदी उत्तम नाईक यांची निवड झाली. शिवसेना सल्लागार किशोर जैन यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय भोसले, युवासेना जिल्हाधिकारी सुधीर ढाणे, विधानसभा संघटक दर्शना जवके, मंजुळा म्हात्रे, सुनील नवले उपस्थित होते.

भिवंडीत शिवसेनेचे 10 सरपंच

भिवंडी तालुक्यातील 28 पैकी 10 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. यामध्ये भादाणे, डोहाळे, गुंदवली, कुरुंद, लोनाड, ओवळी, बापगाव,वेहळे, पडघा, वांद्रे येथील सरपंचपदावर शिवसेनेचे शिलेदार विराजमान झाले.

सरळगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व

मुरबाडः सरळगाव ग्रामपंचायतीवर प्रथमच भगवा फडकला असून सरपंचपदी मधुकर घुडे हे निवडून आले. तर उपसरपंच पदावर विठ्ठल देशमुख यांची निवड झाली आहे. पंचायत समिती सदस्य विष्णू घुडे यांनी विजयी शिलेदारांचे अभिनंदन केले.

उरणमध्ये महाआघाडीची सत्ता

उरण तालुक्यातील सहापैकी चार ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. तालुक्यात सर्वात मोठ्या चाणजे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे मंगेश तळी तर उपसरपंचपदी भाजपचे अशोक कोळी यांची निवड झाली आहे.