
सामना प्रतिनिधी । अलिबाग
अलिबाग तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आघाडीने मुसंडी मारली असून 25 पैकी 12 ग्रामपंचायतीवर पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत. यात शिवसेनेने चौल, थळ या ग्रामपंचायती राखल्या असल्या तरी कुसुबळे, ताडवागळे, कुरकुंडी कोलटेंभी, ढवर या ग्रामपंचायती शेकापकडून खेचून आणल्या आहेत. तर सारळ, आगरसुरे, बामणगाव, चिंचोटी, बेलोशी, कुर्डुस या ग्रामपंचायतीवर शिवसेना व काँग्रेस आघाडीची सत्ता आली आहे. तर शेकापला 13 ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आला आहे. मात्र अलिबागमध्ये शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली असल्याने शिवसैनिकामध्ये नवचैतन्य संचारले आहे. थळचे शिवसेनेचे उमेदवार सुनील पत्रे हे जिल्ह्यात सर्वाधिक साडेतीन हजार मताने निवडून आले आहेत.
रविवारी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान पार पडले. सोमवारी अलिबाग तालुक्यातील नेहुली क्रीडा संकुलमध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र प्रभाग निहाय मतमोजणी घेण्यात आल्याने उमेदवार व प्रतिनिधींनी गोंधळ घातल्याने मतमोजणी बारा वाजल्यानंतर सुरू करण्यात आली.
अलिबागमधील चौल ही पंचायत राजीपचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, थळ ग्रामपंचायत माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी तर कुसुबळे ही तालुकाप्रमुख राजा केणी यांची असल्याने शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने या ग्रामपंचायती प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या तीनही पंचायतीमध्ये शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस सुनील तटकरे यांनी प्रचार केला होता. मात्र या तीनही ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. तर कुसुबळे, ढवर, ताडवागळे, कुरकुंडी कोलटेंभी या ग्रामपंचायतीवर वीस वर्षापासून शेकापची सत्ता होती ती उलथुन टाकण्यात शिवसेनेला यश आले आहे.
सारळ, आगरसुरे या ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच निवडून आले आहेत. बामणगाव, चिंचोटी, बेलोशी, कुर्डुस या ग्रामपंचायतीवर शिवसेना व काँग्रेस आघाडीचे सरपंच निवडून आले आहेत. तर शेकापने काँग्रेसच्या ताब्यातील कावीर ग्रामपंचायत स्वतःकडे खेचण्यात यश मिळविले आहे. शेकापने धोकवडे, चरी, शहापूर, आंबेपूर, पोयनाड, श्रीगाव, बेलकडे, सहाण, बोरघर, रामराज, सुडकोली, वरंडे या ग्रामपंचायती राखण्यात यश आले आहे.


























































