
सामना प्रतिनिधी । धाराशिव
शासनाकडून आलेली मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबूक झेरॉक्स आदी कागदपत्रे जमा करण्याचे काम तलाठ्यामार्फत सध्या सुरु आहे. मात्र ही कागदपत्रे जमा करत असताना तलाठ्याकडून सक्तीने सारा वसुली करण्यात येत आहे, तेव्हा ही सक्तीची सारा वसुली तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे आज जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. शासनाच्या वतीने थोडीफार आर्थिक मदत जाहिर करण्यात आली आहे. ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहंचविण्यासाठी सध्या तलाठ्यामार्फत शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बँक पासबूक झेरॉक्स आदी कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरु आहे. मात्र ही कागदपत्रे जमा करीत असताना कांही तलाठ्याकडून सक्तीने सारा वसुलीही करण्यात येत आहे.
वास्तविक शासनाने संपुर्ण धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करुन सक्तीची वसुली थांबविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी आगोदरच दुष्काळी परिस्थितीने अडचणीत सापडला असून शेतकऱ्याकडून सक्तीने सारा वसुली म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. तेव्हा ही सक्तीची वसुली तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे. तसेच मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
सर निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख सतिश सोमानी, शिवसेना शहरप्रमुख संजय मुंडे, नगरसेवक सोमनाथ गुरव, अक्षय ढोबळे, नितीन शेरखाने, सोमनाथ गुरव, अनंत भक्ते, गुणवंत देशमुख, भिमा जाधव, आण्णासाहेब पवार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या सह्या आहेत.































































