
सामना ऑनलाईन । पिंपरी चिंचवड
शिवाजीनगरहून श्रीरामपूरला जाण्यासाठी निघालेल्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागली. रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास पुणे-मुंबई जुना महामार्गावरील कासारवाडी येथे बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रविवारी शिवशाही बस क्रमांक एम एच 14 / जी यू 2310 ही शिवाजीनगरहून श्रीरामपूर येथे जाणार होती. ही बस रात्री मुक्कामासाठी कासारवाडी येथे होती. श्रीरामपूरला जाण्यासाठी बस सकाळी कासारवाडीहून शिवाजीनगर एसटी स्टँडवर जात असताना बसने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे समजताच चालक पप्पू आव्हाड तत्काळ बसमधून बाहेर पडला. सुदैवाने बस रिकामी होती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाचे जवान अशोक कानडे, अजय कोकणे, राजू काटकर, अक्षय पाटील, शांताराम घारे, शिवाजी चेडे यांच्या पथकाने ही आग विझवली.


























































