कर्मयोगी

1555

>> राजेश देशमाने

सेवात्याग समर्पणाचे धनी असलेले शिवशंकरभाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानचे सेवाकार्य अविरत सुरू आहे. ‘सेवा परमो धर्म’ या तत्त्वानुसार हे संस्थान एकूण बेचाळीस सेवा प्रकल्पांद्वारे अव्याहतपणे भक्तांची सेवा करीत आहे. भक्तांसह आदिवासींच्या सेवेपासून तर अन्नदान, कपडेदान, वैद्यकीय सेवा, मोफत औषधोपचार, शिक्षण, पर्यावरण व आध्यात्मिक सेवेच्या माध्यमातून सेवेचा नवा आदर्श शिवशंकरभाऊंनी घालून दिला आहे.

श्री गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी आध्यात्मिकता व सामाजिक कार्याची सांगड घालून नवा आदर्श समाजासमोर निर्माण केलेला आहे. मंदिर व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून संपूर्ण जग गजानन महाराज संस्थान, शेगावकडे पाहत आहे. या मंदिर व्यवस्थापनाचे संचालन करण्याची जबाबदारी शिवशंकरभाऊ यांच्याकडे वयाच्या अठराव्या वर्षी श्री आज्ञेने आली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी स्वतःला या सेवाकार्यात अखंडपणे वाहून घेतले आहे. संस्थानच्या माध्यमातून विविध सेवाकार्य चाललेले महाराष्ट्रभर पाहायला मिळते. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती ही त्रिसूत्री पक्की करून भाऊसाहेब कार्य करतात.

मंदिरामध्ये येणाऱया लाखो भक्तांच्या निवासाची अल्पदरात व्यवस्था तर आहेच, पण त्याचवेळी त्यांच्या निःशुल्क भोजनाची एकवेळी प्रसादाच्या रूपाने व्यवस्थादेखील केली गेली आहे. टाळकरी, माळकरी आणि वारकरी हे श्री गजानन महाराज संस्थानचे खांब असून काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेवेतून येथील सर्व कारभार चालतो. येथील सेवाधारी हा बिनपगारी असून पूर्ण अधिकारी आहे. त्यांच्यासाठी शिवशंकरभाऊसाहेबांनी स्वतंत्र सेवाधारी विभाग स्थापन केला असून त्यांच्या सुख-दुःखांना ते सदैव मायेचा हात देतात. आज जवळ जवळ 3500 सेवाधारी संस्थानच्या विविध सेवा प्रकल्पांवर कार्यरत दिसून येतात. तेवढेच सेवाधारी ‘वेटिंग’वर कायम असतात. भाऊसाहेबांनी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभे केले आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून शैक्षणिक संस्था उभारली. डोनेशन न घेता इथे शैक्षणिक कार्य होताना दिसून येते. याच शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर तसेच विदेशातसुद्धा कार्यरत आहेत. आदिवासी लोकांसाठी विविध उपक्रम राबविले जात असून त्यांच्यासाठी अधिकाधिक सेवाकार्य कसे करू शकतो, त्यांना मुख्य प्रवाहात कशा प्रकारे आणू शकतो, त्यांच्या संस्कृतीला धक्का न लावता त्यांचे प्राचीन ज्ञान इतरांना कसे उपलब्ध करून देऊ शकतो यासाठी भाऊसाहेबांचे अविरत प्रयत्न सुरू असतात. वर्षातील उत्सवाचे तीन दिवस श्रद्धेपोटी सोडले तर इतर कोणत्याही दिवशी संस्थानचे अन्नही ग्रहण करायचे नाही हा त्यांचा निर्णय त्यांचा समर्पण भाव दाखवतो.

भाऊ 80 वर्षांचे आहेत. या वयातही हा भाव कायम आहे. शेगावसह पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदी, ओंकारेश्वर येथील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित, यशस्वीपणे कार्यवाहीत असल्याची दक्षता ते सतत घेत असतात. 2 हजार मानसेवी, 3 हजार स्वयंसेवक आणि 3 हजार सेवाधारी युवकांची प्रतीक्षा यादी आहे, जे स्वतः सेवेकरी होऊ इच्छितात. दररोज 50 हजार भाविकांना प्रसाद वाटप व्यवस्था, भक्ती निवासातील 3 हजार खोल्या, वैद्यकीय लोकोत्तर सेवाकार्य, अभियांत्रिकी, आदिवासी शाळा, विकास योजना हजारो वारकरी दिंडय़ांना भजनी साहित्य वाटप आजही शिस्तबद्ध सुरू आहे. हे भाऊंचे व्यवस्थापन कौशल्य स्पृहणीय असेच आहे. व्यवस्थापनाची कोणतीही पदवी नाही तरीही अतिशय आदर्शवत नियोजन. जेव्हा लोक भाऊंना भेटून त्यांच्या कार्याची महती सांगतात तेव्हा ‘‘आम्ही कोण करणारे? ही तर श्रींची कृपा!’’ असे ते विनम्रपणे सांगतात. समाधीग्रहण करण्यापूर्वी श्री गजानन महाराजांच्या समक्षच संस्थानाची स्थापना झाली आणि श्रींनीच नियम घालून दिले की, ‘पैसा साचू देऊ नका आणि यात्रा थांबू देऊ नका, पैशाला स्पर्श करू नका आणि पैसा कुणाकडे मागू नका, माझ्या अंगाला स्पर्श करू नका. पैसा भक्तांना दानपेटीत टाकायला सांगा. मठात रात्रीच्या वेळी स्त्रियांना थांबू देऊ नका आणि कुणालाही तीन दिवसांपेक्षा जास्त मठात राहू देऊ नका.’ श्रींनी घालून दिलेल्या नियमानुसार शिवशंकर भाऊ हे सर्व नियम संस्थानच्या बाबतीत तंतोतंत पाळतात. त्याचेच एक उदाहरण द्यायचे झाल्यास एकदा सिटी बँकेचे माजी अध्यक्ष विक्रम पंडित गजानन महाराजांच्या दर्शनाला आले होते. महाराजांचे ते भक्त आहेत, परंतु त्यांची भाऊंशी ओळख नव्हती.

त्यांचे वडील शंकरराव पंडित यांच्याशी ओळख होती. आनंदसागर पाहत असताना शंकरराव पंडित म्हणाले, माझा मुलगा तुमच्याशी बोलणार आहे. असे म्हणून ते आनंदसागर पाहायला निघून गेले. विक्रम पंडित यांनी शिवशंकरभाऊंकडून संस्थानच्या आरोग्य सेवेची माहिती घेतली. आरोग्य सेवा बुलढाणा जिल्हाभरात सुरू करण्याचे सुचवून जिह्यातली माहिती पाठवण्यास सांगितले. माहिती पाठवल्यानंतर त्यांनी पत्र पाठवले की, ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी 700 कोटी रुपये देतो. कोणत्या बँकेत आणि कोणत्या खात्यावर देणगी जमा करू ते कळवा. भाऊ ते पत्र वाचून अचंबित झाले. भाऊंनी आरोग्य सेवेसाठी 700 कोटींपैकी केवळ 70 कोटी रुपये देणगी स्वीकारली. काही दिवसांनी ही देणगी विक्रम पंडितांना परतही केली. आज गजानन महाराज संस्थान, शेगावद्वारे संचलीत ग्रामीण आरोग्य सेवा योजना तेरा तालुक्यांच्या क्षेत्रात असलेल्या ग्रामीण भागात राबविण्यात येते. देशविदेशातून अनेक अर्थतज्ञ, नियोजन तज्ञ येथे येऊन भाऊंच्या या सेवाकार्याच्या नियोजनाचा अभ्यास करतात व चकित होतात. हा श्री गजानन महाराज संस्थान व कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या कार्याचा जीवन गौरवच आहे. येत्या 12 जानेवारी रोजी शिवशंकरभाऊंचा 80 वा वाढदिवस आहे. त्यांचा हा सेवायज्ञ अखंड चालू राहो हीच सदिच्छा!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या