न्यूयॉर्कच्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 जण ठार, तिघे जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका सुपरमार्केटमध्ये एका 18 वर्षांच्या मुलाने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण जखमी झाले. न्यूयॉर्कच्या बफेलो येथील जेफरसन अव्हेन्यूजवळ हा गोळीबार झाला आहे. गोळीबार केल्यानंतर हा माथेफिरू तरुण स्वतःहून पोलिसांना शरण आला. यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना घटनास्थळी येण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे.

शनिवारी जेफरसन अव्हेन्यू येथील एका सुपरमार्केटमध्ये अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला. यावेळी घटनास्थळावर पोलीस पोहोचताच त्यांना सुपरमार्केटच्या आत व बाहेर अनेक मृतदेह दिसले. तर काही जखमी जमिनीवर पडलेले आढळून आले. या मृतांमध्ये एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. तो येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बंदुकधारी तरुण लष्करी वेशभूषेत होता. त्याच्या अंगावर संरक्षण कवचही होते. जेव्हा तो त्याच्या वाहनातून बाहेर पडला तेव्हा त्याच्याकडे खूप शस्त्र होते. त्याच्याकडे हेल्मेटही होते त्या हेल्मेटवर एक कॅमेरा होता ज्याद्वारे ही घटना लाईव्ह स्ट्रीम केली जात होती. अगदी व्हिडीओ गेम मध्ये दाखविल्याप्रमाणे हा घटनाक्रम होता. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर गोळीबार करणाऱ्याच्या मानेवर पोलिसांनी बंदूक धरली आणि शेवटी त्याने शरणागती पत्करली.