देवगड पोलिसांची कारवाई, दुकान फोडी करणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड शहरात मागील काही दिवसांपासून अज्ञात चोरट्याकडून सुरू असलेल्या दुकानफोडीमुळे देवगड पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते, मात्र स्थानिक देवगड पोलीस स्थानकाच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी राबवलेली तपास यंत्रणा आणि त्यामध्ये पाळलेली गुप्तता यामुळे अज्ञात चोरट्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. देवगड पोलीसनिरीक्षक नीलकंठ बगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजन जाधव, पोलीस नाईक अमित हळदणकर यांनी संशयित आरोपीची माहिती काढत गोवा येथून रेल्वेने मुंबईकडे पलायन करीत असताना या चोरट्याला शिताफीने कणकवली येथे ताब्यात घेतले. त्याला पुढील कार्यवाही करून देवगड येथे आणण्यात आले आहे.

आरोपी सापडल्याने व्यापारी वर्गाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. हा आरोपी देवगड शहरातील किनारपट्टीवरील नजीकच्या वाडीतील असल्याचे समजते. यात अन्य आरोपींचा सहभाग आहे का, याचाही शोध देवगड पोलीस घेत आहेत. शहरातील दुकान फोडीचे सत्र सुरू झाल्यानंतर पोलिसांवर टीका होत होती. श्वान पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण, स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभाग सिंधुदुर्ग यांनीही तपास सुरू ठेवला होता. त्यातच मोबाईल कॉल, सीसीटीव्ही फुटेज याद्वारे देवगड पोलिसांनी तपास सुरू ठेवला असताना अखेर दुकान फोडी करणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

या चोरट्याने चोरीचा गुन्हा मान्य केला असल्याचे समजते. संशयित चोरटा देवगड शहरातील खाडीकिनारी लगतच्या वाडीतील असल्याचे निदर्शनास आले. देवगड पोलिसांची ही कारवाई केल्याने व्यापारी, नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्हीमध्ये या चोरट्याचा चेहरा कैद झाला होता. या तपास मोहिमेत जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस हवालदार राजन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, पोलीस नाईक अमित हळदणकर, आशिष नाईक,पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील ठोंबरे यांनी कामगिरी पार पाडली. न्यायालयासमोर आरोपी आकाश मुंकुंद कोयंडे याला हजर केले असता देवगड न्यायालयाने 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.