
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू आणि कश्मीरच्या शोपियान भागात शुक्रवारी सकाळी हिंदुस्थानी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या तिघांपैकी दोघांची ओळख पटली असून लतीफ टायगर आणि तारीक अशी दोघांची नावे असल्याचे कळते. या दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठी हस्तगत करण्यात आला आहे.
आज सकाळीच शोपियानमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराच्या जवानांना मिळाली होती. त्यानुसार संपूर्ण भागाला घेराव घालण्यात आला. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. काही तास सुरू असलेल्ल्या या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले तर हिंदुस्थानचा एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, चकमक थांबली असली तरी शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून या भागातील इंटरनेट सेवा आणि रेल्वे सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे.




























































